उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष – नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा अशा तीन राज्यांच्या सीमेवर नावलौकिकता मिळवलेली उदगीर कृषी उत्पन्न बाजार समिती स्वच्छतेच्या बाबतीत गंभीर समस्येमुळे चर्चेत आली आहे. बाजार परिसरातील स्वच्छतेकडे प्रशासनाचे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
डॅम रोड आणि शिवाजी महाराज चौक परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या डॅम रोड व छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर अनेक ठिकाणी गटारांची व्यवस्था नाही. त्यामुळे साचलेल्या घाणपाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. काही व्यवसायिक दुकाने समोरून व्यवस्थित दिसत नाहीत, तर काही मोठ्या इमारती पाठीमागील बाजूला असून त्यांच्याशी संलग्न असलेल्या गोदामांमध्ये अस्वच्छता जाणवत आहे.
नगरपालिकेचेही दुर्लक्ष असल्याबाबत नागरिकांतून ओरड होत आहे.
नागरीकांच्या आरोपानुसार, नगर पालिका प्रशासन घरपट्टी, पाणीपट्टी आणि अन्य कर नियमित वसूल करत आहे, मात्र स्वच्छतेसाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. बाजार समिती परिसरातील मागील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य असून, तेथून येणाऱ्या दुर्गंधीमुळे स्थानिक व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या स्वच्छतेमुळे हा विषय म्हणजे नागरिकांमध्ये संताप निर्माण करणारा विषय बंद आहे.
“सुंदर शहर, स्वच्छ शहर” हा नारा देण्यात येतो, पण प्रत्यक्षात मात्र स्वच्छतेसाठी कोणतीही जबाबदारी घेतली जात नाही, अशी टीका स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी केली आहे. बाजार समिती व नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे संभाव्य रोगराई पसरू शकते, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
बाजार समितीने त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी. गटारांची व्यवस्था करण्यात यावी, नियमित स्वच्छता कर्मचारी नियुक्त करावेत, दुर्गंधी आणि संभाव्य साथीच्या रोगांवर त्वरित उपाययोजना करावी.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाला लवकरात लवकर स्वच्छता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. स्वच्छता राखली नाही तर आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.