श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे ऑलिंपिक वीर कुस्तीपटू खाशाबा जाधव जयंती राज्य क्रीडा दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथम ऑलिंपिक वीर कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन करून, अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक नादरगे एस. व्ही. उपस्थित होते. नियमांचे पालन करून खेळला जाणारा खेळ यशस्वी खेळाडू घडवितो. खेळ खेळून आरोग्य संपदा कमवा असा संदेश प्रमुख पाहुणे क्रीडाशिक्षक केंद्रे एम. एस. यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला. मेहनत करणे हीच यशाची गंगोत्री आहे, म्हणून मेहनत करा व उज्वल भविष्य घडवा, असा संदेश कासले जी. एच. यांनी विद्यार्थ्यांना दिला. खेळ म्हणजे डॉक्टराविना मिळणारा उपचार होय, म्हणून खेळ खेळून आरोग्यदायी जीवन जगा असा मोलाचा संदेश केंद्रे डी.पी. यांनी दिला. अध्यक्षीय विचारातून खेळाचे महत्व नादरगे एस. व्ही. यांनी सांगितले. सूत्रसंचलन देवकते पी.बी. यांनी केले. आभार भोळे आर. आर यांनी मांडले. याप्रसंगी सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.