किलबिल बाल आनंदोत्सव उत्साहात संपन्न, सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांची विशेष उपस्थिती
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील किलबिल नॅशनल स्कुल शाळेचा वार्षिक स्नेह संमेलन दि 18 व 19 रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी उद्घाटक म्हणून माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव तर अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले तर प्रमुख पाहुणे म्हणून अंधश्रध्दा निर्मुलन समिती राज्य निमंत्रक हरिदास तम्मेवार , केंद्रप्रमुख संभाजी कासले,जवळगा ग्राम पंचायत सरपंच गिरिजा मुळे, माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे, प्राचार्य संतोष पाटील उपप्राचार्य धरमसिंग शिराळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात पहिल्या दिवशी एकूण 57 गीतांमध्ये हिंदी, मराठी युगुल गीतासह लावणी, गोंधळ, शेतकरी गीत, कोळीगीत यावर ठेका धरत बालकलाकारांनी आपल्या अंगी असलेल्या सुप्त गुणांची मुक्त उधळण करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना योग्य स्टेज मिळावे व विद्यार्थी सभाधीट बनवण्यासाठी वार्षिक स्नेह संमेलन आयोजित केले जाते. तर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी सिनेअभिनेते भारत गणेशपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ज्ञानोबा भोसले तर व्यासपीठावर दिग्दर्शक चंद्रशेखर सांडोळे,सुधीर सोमवंशी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मंचकराव पाटील, संचालक रामदास कदम, निर्माते दत्ताभाऊ जवळगे, मेस्टा चे जिल्हा अध्यक्ष पुष्पराज खुब्बा, महेश देवणे, व्यंगचित्रकार चंद्रशेखर भालेराव, बालासाहेब कदम, पत्रकार बालाजी काळे, बालाजी कदम, सरोजा भोसले, प्राचार्य संतोष पाटील उपस्थित होते. भारत गणेशपुरे सर बोलताना म्हणाले की आजच्या शैक्षणिक कार्यप्रणालीत डोळस पालकत्वाची गरज आहे. विद्यार्थी सर्व गुणसंपन्न बनवण्यासाठी शिक्षक पालक व शाळा यांचा समन्वय असणे गरजेचे आहे. सर्वच विद्यार्थी अभ्यासात हुशार असतात असं नसते, काहीना इतर कलेत आवड असते त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या उपजत कलांना वाव दिला पाहिजे. मुलांना मोबाईलचा वापर व गैरवापर याचेही मार्गदर्शन करणे जरूरी आहे. असेही ते म्हणाले.
शालेय राष्ट्रीय तलवारबाजी, बॉल बॅडमिंटन, कराटे, स्पर्धा परीक्षा, भाषण स्पर्धा,निबंध स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन यामधील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या दोन्ही दिवशी विद्यार्थ्यानी खरी कमाई चे स्टॉल लावले होते. सूत्रसंचालन सचिन जगताप, सुनीता सरवदे,श्रीकांत वलांडे यांनी केले तर प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य संतोष पाटील ,उपप्राचार्य धरमसिंग शिराळे यांनी केले, अभिनेते यांचा परिचय पर्यवेक्षक महावीर गोडभरले तर आभार सरोजा भोसले यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमास पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.