लालबहादुर शास्त्री प्राथमिक शाळेत बक्षीस वितरण समारंभ संपन्न.
उदगीर (एल.पी.उगीले ): भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचालित लाल बहादूर शास्त्री प्राथमिक विद्यालयात स्नेहसंमेलना निमित्त घेण्यात आलेल्या विविध क्रीडा स्पर्धांच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे तर,प्रमुख अतिथी म्हणून बालवाडी विभागाच्या अध्यक्षा अंजलीताई नळगीरकर, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे, विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी तसेच स्नेहसंमेलन प्रमुख सौ.सविता बोंडगे व सहप्रमुख बळवंत देशमुख उपस्थित होते.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले.सर्व मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी इयत्ता तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी कवायतीचे खडे व बैठे प्रकार उत्कृष्टपणे सादर केले.इयत्ता पहिली ते चौथीच्या धावणे,थैलारेस,तिनटांगी दौड,संगीत खुर्ची, लिंबू चमचा,कबड्डी,लंगडी,दोरी रेस,रस्सी खेच,बादलीत चेंडू टाकणे, बेडूक उड्या, स्मरणशक्ती स्पर्धा व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा अश्या विविध क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी शालेय स्पर्धांमधून आपल्या अंगी खिलाडूवृत्ती, चिकाटी,समुह भावना व शिस्त जोपासली जाते.खेळामुळे आपले मन प्रसन्न व शरीर बलवान होत असते.अपयश पचवण्याची ताकद निर्माण होते.यशाने हुरळून जाऊ नये व अपयशाने खचून न जाता पुढे होणाऱ्या स्पर्धेसाठी तयार होण्याचे आवाहन केले.विविध क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
स्वागत व परिचय श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी यांनी केले तर, प्रास्ताविक मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी केले.सुत्रसंचलन सचिन आगलावे यांनी केले तर, बक्षीस वितरण यादी वाचन श्याम गौंडगावे व सौ.भाग्यश्री स्वामी यांनी केले.आभार सौ.सविता बोंडगेबाईंनी मानले.
