शाहूवाडी (शिवाप्पा पाटील) : शिक्षकांच्या क्षमता वाढविणारे प्रशिक्षण शिक्षकांसाठी प्रेरणादायी असून सक्षम शिक्षकच एकविसाव्या शतकातील मूलभूत कौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये रुजवू शकतील. शिक्षक ही केवळ एक व्यक्ती नसून सकारात्मकता, आशावाद आणि उत्तुंगतेची आस असणारे संस्काराचे एक फार मोठे विद्यापीठ आहे. ध्येयवेड्या शिक्षकांनी एकविसाव्या शतकाची आव्हाने समर्थपणे पेलणारे विद्यार्थी तयार करावेत. त्यासाठी शिक्षकांनी मुलांमध्ये जगण्याचे बळ निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन शाहूवाडीचे गटशिक्षणाधिकारी डॉ. विश्वास सुतार यांनी केले. त्यांनी गुरुवार (ता. १३) रोजी मलकापूर येथे उत्साहात सुरु असलेल्या पाच दिवसीय 'शिक्षक क्षमतावृद्धी प्रशिक्षण २.०' शिबिरास भेट देऊन प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मार्गदर्शन केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, कोल्हापूरचे वरिष्ठ अधिव्याख्याता प्रा. रमेश कोरे, शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी प्रशिक्षण कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकास्तरीय समन्वयक शंकर सूर्यवंशी यांनी केले. सुलभक प्रा. दादासाहेब श्रीराम, मानसी जाधव, दीपक कोडोलकर, उत्तम पवार यांनी स्वागत केले. कौशल्यवर्धनासह विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीचा विकास देखील शिक्षकांनी करावा, असेही गटशिक्षणाधिकारी श्री. सुतार यांनी सांगितले.
डॉ. विश्वास सुतार यांनी शिक्षकांच्या क्षमतावृद्धीवर भर देत शिक्षण क्षेत्रातील नवनवीन संधी आणि अध्यापन कौशल्ये वाढवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षकांनी स्वतःच्या क्षमतांची ओळख करून घेतली तर ते विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अधिक सक्षम होतील, हेही त्यांनी स्पष्ट केले. शिक्षकांचे प्रशिक्षण केवळ अध्यापन पद्धतीत सुधारणा घडवत नाही, तर त्यांच्या सृजनशीलतेला चालना देत विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यास सक्षम बनवते, असेही ते म्हणाले. याप्रसंगी डॉ. सुतार यांनी स्वतःच्या गायन कौशल्याचा दाखला देत आपली क्षमता शोधून ती विकसित कशी करावी याचा आदर्श वस्तुपाठच उपस्थित प्रशिक्षणार्थ्याना घालून दिला. शिक्षकांच्या सततच्या कौशल्यवृद्धीमुळे शिक्षण अधिक परिणामकारक होईल आणि त्याचा थेट सकारात्मक परिणाम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यात दिसून येईल, अशी आश्वासक भूमिका त्यांनी यावेळी मांडून तालुक्यातील शेकडो शिक्षकांना मार्गदर्शन केले. सुलभक मारोती शेट्टेवाड यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. रुपाली डुबल यांनी आभार मानले.