औसा शहरातील सावली लॉजवर छापा, वेश्या व्यवसाय चालविनाऱ्यावर कारवाई
लातूर (एल.पी.उगीले) जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप हे सतत अवैध धंद्याच्या विरोधात भूमिका घेत असली तरी स्थानिक पोलीस मात्र चिरीमिरीच्या नादात याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. औसा परिसरात मोठ्या प्रमाणात वेश्याव्यवसाय चालत असल्याची ओरड गेल्या अनेक दिवसांपासून चालू होती. त्याची दखल घेऊन दामिनी पथक आणि अवैध मानवी देह व्यापार प्रतिबंधक पथकाच्या वतीने या सदर्भात गांभीर्याने दखल घेऊन औसा शहरातील एका लॉजवर धाड टाकून वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या वर कारवाई केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, औसा शहरातील सावली लॉजवर दामिनी पथक व अनैतिक मानवी देह व्यापार प्रतिबंधक पथक शाखेने छापा टाकून 1 महिलेची सुटका केली व वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या दोन आरोपीं विरुद्ध औसा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे.
औसा शहरात लॉज व हॉटेलच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याबाबत गुप्त माहिती मिळाल्याने सदर बाबत कडक कारवाई करणेसाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे कडून सक्त आदेश पारित झाले होते.
त्या अनुषंगाने औसा शहरातील सावली लॉज, तुळजापूर टी पॉइंट, निलंगा रोड येथे तेथील मालक व मॅनेजर काही महिलांना लॉजवर आणून वेश्या गमनासाठी एजंट करवी गिऱ्हाईक आणून वेश्या व्यवसाय चालवीत आहेत अशी गुप्त माहिती प्राप्त होती.
मिळालेल्या माहितीची खातरजाम करून त्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने बनावट ग्राहक वेश्या गमनाच्या नावाखाली लॉजवर पाठविण्यात आला होता. बनावट ग्राहकाकडून इशारा मिळताच पथकाकडून सावली लॉजवर छापा टाकण्यात आला. सदर छाप्यात बाहेर गावाहून आणलेली एक महिला मिळून आली, तर लॉज मॅनेजरला लॉजवरून ताब्यात घेण्यात आले आहे.
सदर प्रकरणी वेश्या गमनासाठी आणलेल्या एक महिलेची सुटका करण्यात आली आहे तर आरोपी नामे प्रवीण बालाजी कल्याणी (वय 22 वर्षे, रा. उत्का, तालुका औसा),व्यंकट गोरोबा जगताप, (रा. संभाजीनगर औसा.(लॉजचा चालक))
यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास औसा पोलीस हे करीत आहेत.
वेश्या व्यवसाया बाबत काही माहिती मिळाल्यास त्याबाबत अनैतिक मानवी देह व्यापार प्रतिबंधक कक्ष, पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर येथे कळविण्या बाबत लातूर पोलिसांकडून आवाहन करण्यात येत आहे.
सदरची कारवाई सोमय मुंडे, पोलिस अधीक्षक, लातूर ,डॉ. अजय देवरे, अपर पोलिस अधीक्षक, लातूर यांचे मार्गदर्शनात, दामिनी व AHTU पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील, पोलिस उपनिरीक्षक सुभाष सूर्यवंशी, पोलीस अंमलदार सदानंद योगी, प्रकाश जाधव, महिला अमलदार लता गिरी, मीना पवार, मीरा सोळंके, सुजाता चिखलीकर, यांनी केली आहे.
