हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर,देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर छापेमारी. 05 लाख 21 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
लातूर (एल.पी.उगीले) जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 16/02/2025 रोजी पहाटे अचानकपणे मासरेड चे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून-छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर वरिष्ठांचे मार्गदर्शनात जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या 83 लोकांवर 83 गुन्हे दाखल करून 5 लाख 21 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, व हातभट्टीच्या मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी 32 पोलीस अधिकारी, 118 पोलीस अमलदारांचे विशेष पथके बनवून राबविण्यात आलेल्या मासरेड मध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून- छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यावर तसेच देशी-विदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणारे 83 इसमावर 83 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये हातभट्टी, हातभट्टीचे रसायन, हजारो लिटर देशी व विदेशी दारू असा एकूण 5 लाख 21 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त, हजारो लिटर हातभट्टी दारू व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे.
अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसा कडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत असून सदरची कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाने कळवले आहे
