कृतीतून सामाजिक जाणीवा जपण्याचा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज – डॉ. तेलगाने

0
कृतीतून सामाजिक जाणीवा जपण्याचा मूलमंत्र देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज - डॉ. तेलगाने

उदगीर (एल. पी. उगिले)
मानवी जीवन सार्थकी लावायचे असेल तर जनतेची सेवा हीच ईश्वरसेवा, अशी भावना ठेवून सामाजिक कार्याला प्राधान्य दिले पाहिजे. असा मूलमंत्र देत असतानाच स्वच्छतेचा आग्रह धरून स्वतःच्या कृतीतून स्वच्छता मोहीम प्रत्यक्ष राबवणारे राष्ट्रसंत म्हणजे गाडगे महाराज होय. असे विचार प्रबोधनात्मक प्रवचनकार तथा उदगीर येथील ओम हॉस्पिटल अँड मॅटरनिटी होम चे तज्ञ डॉ. शरद कुमार तेलगाने यांनी व्यक्त केले.
ते राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत गाडगे महाराज चौक, शेतकरी निवास येथे अभिवादनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
राष्ट्रसंत गाडगे महाराज एक थोर समाज सुधारक तर होतेच होते, त्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा संपायला पाहिजेत. यासाठी समाज प्रबोधन करण्यासाठी कीर्तन हे प्रभावी साधन निवडले होते, तसेच स्वच्छता मोहीम राबवणे हे कर्तव्य समजून त्यांनी अविरत कार्य केले आहे. समाजाला अनिष्ट रूढी बद्दल लोकांना समजावे म्हणून कठोर शब्दात ते प्रहार करत होते. समाजाला शिक्षणाची नितांत गरज आहे. हा उपदेश देऊन समाजातील अज्ञानी लोकांना विज्ञानवादी दृष्टिकोन देणारे महामानव म्हणजे राष्ट्रसंत गाडगे महाराज आहेत. मंदिरातील दगडात देव नसून समाजात उपेक्षित म्हणून अवहेलना सहन करणारा सर्वसामान्य माणसात देव आहे. असे प्रबोधन करून माणसातील देव शोधण्याचा मानवतावादी दृष्टिकोन जगाला देणारे राष्ट्रसंत म्हणजे गाडगे महाराज होय. निश्चितच अंधश्रद्धेत गुरफटून राहिलेल्या समाजाला कर्मकांडातून बाहेर काढण्यासाठी सतत धडपडणारा प्रयोगशील संत गाडगे महाराज होते, असेही सांगितले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष विनोद तेलंगे, धोबी समाजाचे अध्यक्ष अमोल गाजरे, प्रशांत शिंदे, संतोष गाजरे, बालाजी भालेराव, महादेव गाजरे, विजय तेलंगे, रवी कुमार देगलूरे, डेबू भालेराव, आकाश भालेराव, आशिष भालेराव, रामराजे मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. शरदकुमार तेलगाने यांनी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या जीवनातील अनेक प्रसंग सांगून, गाडगे महाराजांची विचार अंगीकारावेत असे आवाहन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी आपले विचार मांडताना राष्ट्रसंत गाडगे महाराज यांनी उपेक्षित समाजाला न्याय देण्यासाठी तत्कालीन समाज व्यवस्थेवर घनाघाती हल्ला केला. चातुर्वर्ण व्यवस्थेमुळे ज्या रुढीपरंपरा चालत होत्या त्या बंद करण्यासाठी प्रबोधन केले. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी अशा पद्धतीला प्राधान्य देणार हा राष्ट्रसंत होता. समाज प्रबोधनासाठी आणि समाजाला दिशा देण्यासाठी त्यांनी आपलं जीवन समर्पित केलेले आहे. त्यांनी लोकांच्या हिताचा विचार प्राधान्याने मांडला, याची जाणीव ठेवून केवळ जयंती पुण्यतिथी साजरी करण्या इतपतच अशा राष्ट्रसंतांची आठवण न ठेवता त्यांचे विचार प्रत्यक्ष आपल्या कृतीत आणण्याचा प्रयत्न केल्यास राष्ट्राचा विकास होईल अशी अपेक्षाही संजय राठोड यांनी व्यक्त केली. याप्रसंगी समता नगर परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!