विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये चांगुलपणा जपावा : ब्रह्मकुमारी महानंदा बहेनजी
उदगीर (एल.पी.उगीले) : विद्यार्थी जीवन हे पुन्हा न येणारे आहे. त्यामुळे या काळात उत्तम शिक्षण घेऊन विद्यार्थ्यांनी सुशिक्षित होण्यासोबत सुसंस्कृत बनावे. त्यासोबतच स्वतः मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी चांगुलपणा जपावा. असे आवाहन येथील प्रजापिता ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ब्र. कु. महानंदा बहेनजी यांनी केले.
रोटरी क्लबच्या वतीने येथील उदय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना ई लर्निंग साठी कॉम्पुटर व अन्य साधन सामुग्री भेट देण्यात आली. तसेच रोटरी क्लबच्या वतीने फेब्रुवारी महिना हा जागतिक शांतता महिना म्हणून साजरा करण्यात येत आहे. यनिमित्ताने आयोजित कार्यक्रमात महानंदा बहेनजी बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी, उपाध्यक्ष रवींद्र हसरगुंडे, सचिव ज्योती चौधरी, विशाल जैन, विशाल तोंडचिरकर, महानंदा सोनटक्के, संतोष फुलारी, विक्रम हलकीकर, बजरंग चंदनशिवे, डॉ. राधिका बिरादार, राजश्री मुंडे, जनाबाई मुंडे, मुख्याध्यापिका रंजना चाटे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना महानंदा बहेनजी म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षण घेत असताना आपल्या सोबतच्या विद्यार्थ्यांना देखील शक्य ती मदत करावी. आपल्या जीवनात यशस्वी होण्यासाठी सकारात्मक विचार बाळगून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही आवाहन केले.
यावेळी बोलताना रोटरी क्लबच्या अध्यक्षा सरस्वती चौधरी यांनी रोटरी क्लबने ई लर्निंग ची सोय उपलब्ध करून दिली असून त्याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी विशाल जैन व विशाल तोंडचिरकर यांनी रोटरी क्लबची भूमिका मांडली. मुख्याध्यापिका रंजना चाटे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती देऊन विद्यार्थ्यांना सुसंस्कृत करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक पुढाकार घेत असल्याचे सांगितले.
