उदगीरमध्ये आढळला दुर्मिळ रसेल कुकरी प्रजातीचा साप
उदगीर (एल.पी.उगीले): सहसा या भागात न आढळणारी सापाची रसेल कुकरी ही प्रजात सोमवार दिनांक 24 फेब्रुवारी रोजी अर्जुन मद्दे यांच्या संजय नगर सोमनाथपूर रोड येथील घरात सायंकाळी आढळून आली.
या बिनविषारी सापास उदगीर येथील वन्यजीव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सदस्य सर्पमित्र व्यंकटेश विजयकुमार तोरकडे आणि सर्पमित्र संघटनेचे अध्यक्ष संदीप वाघमारे यांनी अतिशय शिताफीने कोणासही इजा न होऊ देता ताब्यात घेतले. घरात साप असल्याचे आढळून येताच अर्जुन मद्दे यांनी तातडीने सर्पमित्र व्यंकटेश तोरकडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली, तेव्हा हा साप पकडून जंगलात सोडण्यात आला. या प्रजाती विषयी माहिती देताना सर्पमित्र संदीप वाघमारे म्हणाले की, साधारणतः ही प्रजात आपल्या कडे भारतात ईशान्येकडील राज्य तसेच जम्मू-काश्मीर वगळता सर्वत्र आढळून येते. त्यांची सरासरी लांबी 1 फूट तर अधिकतम लांबी 1 फुट 11 इंच लांबी असून रंग व आकार डोके तसेच मानेवर उलटी इंग्रजी ‘व्ही’ (V) ची खूण असते. पोट पांढरे किंवा फिकट पिवळसर, अंगावर चार पिवळसर रेषा,शरीर सडपातळ. आखूड शेपूट, जंगलात किंवा दमट भागात आढळणाऱ्या या सापावर फिकट तपकिरी रंगावर गडद तपकिरी धब्बे असतात. व शुष्क प्रदेशात आढळणाऱ्या सापावर फिकट तपकिरी रंगावर चार रेषा असतात. प्रजनन एप्रिल महिन्यामध्ये मादी सुमारे 5 ते 9 अंडी घालते. खाद्य लहान सरपटणारे प्राणी व त्यांची अंडी, तसेच उभयचर व त्यांची अंडी. लहान असताना कीटक, अळया व कोळी हे आहारामध्ये घेतात. या प्रजातीची वैशिष्ट्य म्हणजे दिनचर तसेच निशाचर, शांत स्वभावाचा पण चिडला असता शरीर फुगवून हल्ला चढवतो. इत्यादी माहिती दिली.यावेळी सर्पमित्र विशाल कल्लुरे, सुरज वाघमारे, निशांत कांबळे, सुखदेव गोटमुकले, किरण पवार, परमेश्वर गोटमुकले, अक्षय गिरी, चंदू वाघमारे, अभिजीत कांबळे, अमोल कांबळे, कुशाल सूर्यवंशी, अभिषेक शिंदे, ब्रमदास सूर्यवंशी, नतीश वाघमारे, खंडू भोसले इत्यादी उपस्थित होते. आजपर्यंत सर्पमित्रांनी वाचविलेल्या प्राणात मोर, हरण, घुबड, घोरपड, माकड, रानटी ससा, शॅमोलियन सरडा, होला पक्षी, कावळा, उदमांजर (मरलांगी), सायाळ इत्यादींना जीवदान दिले. तरी सर्पमित्र संदीप वाघमारे यांनी13 ते 14 वर्षात 10000 सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले.
उदगीर शहर परिसरात जखमी प्राणी, पक्षी किंवा साप आढळल्यास संदिप वाघमारे मो.9764582750, व्यंकटेश तोरकडेमो.8263924380 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
