महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

0
महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. मस्के होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश देवशटवार, प्रादेशिक उपायुक्त, सामाजिक न्याय, लातूर, यांची उपस्थिती होती. मराठी भाषेला प्राचीन व समृद्ध वारसा लाभला असून, केंद्र शासनाने नुकताच अभिजात भाषेचा दर्जा प्रदान केला आहे. महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांतही मराठी भाषा मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते. तसेच, फिजी, मॉरिशस, ऑस्ट्रेलिया आणि इस्त्रायलसारख्या देशांतही मराठीभाषा बोलली जाते. मराठी भाषा, वाचन आणि अभ्यास यासाठी जागतिक स्तरावर मागणी वाढत आहे, आपल्या भाषेचा आपल्याला अभिमान असला पाहिजे व आपण मराठीवर निरपेक्ष असे प्रेमही केले पाहिजे असे अविनाश देवशटवार यांनी आपल्या भाषणात नमूद केले. प्राचार्य डॉ. मस्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा रुजवली, छत्रपती शिवाजी महाराजांनी तिचे संरक्षण केले आणि विविध संतांनी तिचा प्रसार केला, असे सांगितले. मराठी भाषेचे संवर्धन करणे ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमात कु. संध्या जमादार हिने तयार केलेल्या अक्षरे भीत्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. तसेच, ऋतुजा भोळे, अवंतिका गायकवाड आणि मुक्ता सूळ या विद्यार्थिनींनी काव्यवाचन सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पदव्युत्तर मराठी विभागप्रमुख डॉ. दीपक चिद्दरवार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.अर्चना मोरे यांनी, तर आभार प्रदर्शन प्रा. नागीण रोडगे यांनी केले. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. बी. आर. दहिफळे, प्रा. डॉ. के. एस. भदाडे, तसेच मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष जोतीराज साळुंके हे होते. महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!