श्री पांडूरंग विद्यालयात जागतिक वन्यजीव दिनानिमित्त रंगभरण चित्रकला स्पर्धा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) जागतिक वन्यजीव दिनानिमित्त श्री पांडूरंग विद्यालय, कल्लूर येथे चित्रकला, रंगभरण स्पर्धेचे आयोजन कलाशिक्षक नादरगे चंद्रदीप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. विविध रंगसंगतीतून वन्य जीवनाचे सौंदर्य आपल्या चित्रांमधून साकारले. विद्यार्थ्यांनी सृजनशीलतेच्या माध्यमातून निसर्ग व वन्यजीव संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांमध्ये कलात्मक अभिव्यक्तीला चालना मिळाली असून, निसर्गप्रेम व पर्यावरण संवर्धनाची जाणीवही निर्माण झाली. स्पर्धेतील उत्कृष्ट चित्रांना विशेष बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
या स्पर्धेमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला. त्यात श्रवणी अमोल कुंडगीर – वर्ग 7 वा प्रथम, कासले प्रतीक निवृत्ती – वर्ग 8 वा द्वितीय, टाळकुटे रुक्मिणी नारायण – वर्ग 7 वा तृतीय, पाटील हरिओम नारायण – वर्ग 5 वा उत्तेजनार्थ, कुंडगीर शुभम सुनील – वर्ग 8 वा उत्तेजनार्थ अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी रंगभरण स्पर्धेत यश मिळवले आहे. स्पर्धेतील विद्यार्थ्यांची चित्र पाहून शाळेचे मुख्याध्यापक नादरगे एस.व्ही. यांनी विद्यार्थ्यांचे खुप कौतुक केले. चित्रांमधून जंगलातील जैवविविधता, पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व, तसेच वन्यजीव वाचविण्याचा संदेश प्रभावीपणे उमटला आहे, असे ते म्हणाले. या रंगभरण चित्रकला स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदानी सहकार्य केले.
