भविष्यातील सक्षम नेतृत्व राष्ट्रीय सेवा योजनेतून घडते- कुलसचिव डॉ.पवार
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या संयुक्त विद्यमाने ‘जिल्हास्तरीय युवक-युवती नेतृत्व विकास शिबिर 2025’ चे उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. शिबिर 6 मार्च ते 10 मार्च 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य प्रा. मनोहरराव पटवारी होते, तर उद्घाटक डॉ. डी.डी. पवार, कुलसचिव, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मल्लीकार्जुन करजगी, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व प्रा. डॉ. केशव आलगुले, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना, लातूर, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के उपस्थित होते. या शिबिरामध्ये युवक-युवतींना नेतृत्वगुण, समाजसेवा, व्यक्तिमत्त्व विकास आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध उपक्रमांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणिवा आणि नेतृत्व क्षमता विकसित होईल. शिबिराच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. होकरणे, प्रा.डॉ.एस. व्ही. भद्रशेट्टे, प्रा. डॉ. एन. डी. वगशेट्टी कार्य करत आहेत.
