ग्रामीण भागातील पशुपालकांना पशु सखीचा आधार – प्रा. डॉ. अनिल भिकाणे
उदगीर (एल.पी.उगीले)
जागतिक बँक अर्थसहाय्यीत बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प पशुसंवर्धन विभाग व महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेळी व कुक्कुट पालन सुधारनेसाठी पशुसखीचे कौशल्य विकास कार्यक्रम या प्रकल्प अंतर्गत ‘शेळी व परसातील कुक्कुट पालन प्रशिक्षण’ या विषयावर दुसरे १५ दिवसीय निवासी प्रशिक्षण दि. ०३ मार्च ते १७ मार्च २०२५ दरम्यान पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीरचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटक संचालक विस्तार शिक्षण प्रा. डॉ. अनिल भिकाणे यांनी सदर प्रशिक्षणात सहभागी झालेल्या पशुसखीचे कार्य हे समाजाची सेवा असून या ज्ञानाचा वापर ग्रामीण भागातील पशुपालकांना नक्कीच उपयोगी पडेल, असे उद्गार काढले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोपाल भारकड तसेच प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रामीण विकास संस्था लातूर चे प्रकल्प संचालक कल्पना क्षिरसागर तथा स्मार्ट प्रकल्प संचालक कल्पना कारगावकर आणि डॉ सारीपात लांडगे, प्रकल्प समन्वयक (दृकश्राव्य माध्यमातून) उपस्थित होते. सदर प्रशिक्षणात एकूण २५ पशुसखी सहभागी झाल्या. या कार्यक्रमाचे आयोजना करिता डॉ लक्ष्मीकांत कोकाटे स्मार्ट समन्वयक, डॉ जि आर चन्ना सह-समन्वयक, डॉ. पी. व्ही. पाटील सह-समन्वयक, डॉ. विलास डोंगरे, डॉ. श्याम काळे यांनी मोलाचे कार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. व्ही. जाधव व आभार प्रदर्शन डॉ. व्ही. एन. खंडाईत यांनी केले.
