उदगीर हे अधिकारी बनवणारे केंद्र व्हावे-डॉ.नरसिंग कदम

0
उदगीर हे अधिकारी बनवणारे केंद्र व्हावे-डॉ.नरसिंग कदम

उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर हे शैक्षणिक दृष्ट्या अतिशय नावाजले गेलेले शहर आहे.प्रत्येक क्षेत्रामध्ये उदगीरणे आपला एक नवा इतिहास निर्माण केलेला आहे. तशाच पद्धतीने उदगीर हे अधिकारी बनवणारे केंद्र ठरावे असे मत मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई चे सदस्य तथा छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालय येथील साहित्यिक डॉ.नरसिंग कदम यांनी काढले. मराठी विश्वकोश निर्मिती मंडळावर सदस्य म्हणून निवड झाल्याबद्दल व साहित्य क्षेत्रामध्ये अतिशय मोलाचे योगदान देत असल्याबद्दल परिवर्तन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व अभ्यासिका यांच्या वतीने त्यांच्या सत्काराचे आयोजन व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन ठेवण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष परिवर्तन अकॅडमी चे संचालक श्री एन.एस.गोरे होते. तर प्रमुख उपस्थिती संचालक एस.डी. देवकते, आनंद हुरदळे, प्रमोद कावरे, डॉ.चव्हाण सुरेश यांची होती. पुढे बोलताना कदम म्हणाले, उदगीर मधील शाळा, महाविद्यालय मधून शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षेचे वातावरण अतिशय चांगल्या पद्धतीने तयार केलेले आहे. विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्याचे काम चांगल्या पद्धतीने होत आहे. अभ्यासाला उत्तम बैठक मिळावी म्हणून परिवर्तन केंद्राच्या वतीने उत्तम अभ्यासिकेचे नियोजन केलेले आहे.या अभ्यासिकेमध्ये विद्यार्थ्यांनी सातत्य राखून अभ्यास करावा आणि स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन उदगीरचे नावलौकिक वाढवावे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये उदगीर येथील विद्यार्थी नोकरीला असावेत असेही यावेळी त्यांनी म्हटले. अध्यक्षीय समारोपप्रसंगी गोरे म्हणाले, उदगीर येथील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत चांगले यश मिळावे म्हणून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीची अभ्यासिका तयार केलेली आहे. या अभ्यासिकेचे विशेष म्हणजे शहराच्या मध्य वस्तीमध्ये अभ्यासिका, मुला मुलींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था, शांत आणि प्रसन्न वातावरण यामुळे विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे, आणि त्यांचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होत आहे. कार्यक्रमाला स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!