जगण्यासाठीचा आदर्श पाठ म्हणजे इंटिमेट डेथ – अर्चना मुळे.
उदगीर (एल.पी.उगीले) जन्म आणि मृत्यू हे आयुष्याचे दोन टोक आहेत. पुनर्जन्म किंवा अस्तित्व हे मृत्यूने लावलेला शोध आहे. जगणं समृद्ध असेल तर मृत्यू चांगला येतो. वर्तमानाच्या आशा, वेदनांचे मर्म, जीवनातील सुख- दुःख आणि मृत्यू यांच्यातला संवाद पुनर्स्थापित केले तर आयुष्यावरच प्रेम माणसाला जगण्याची प्रेरणा देत. खरे आयुष्य जगण्यासाठीचा आदर्श पाठ घालून देणारी साहित्य कृती म्हणजे इंटिमेट डेथ हि होय. असे मत अर्चना मुळे, सांगली यांनी व्यक्त केले.
श्रुतिका बिपिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गतच्या महिला दिन विशेष 332 व्या वाचक संवादामध्ये सांगली येथील सुप्रसिद्ध समुपदेशक अर्चना मुळे यांनी डॉ. मारी डी हेनेझेल लिखित इंटिमेट डेथ या साहित्यकृतीवर सुंदर असा संवाद साधताना त्या म्हणाल्या की, मृत्यू हे एक फार मोठे रहस्य आहे. मृत्यूमुळेच आयुष्याला मोल येत. मृत्यूला नाकारण्यापेक्षा त्याला जीवनाचा एक भाग बनवला पाहिजे. कारण मरणासन्न व्यक्ती आपल्या वेदना, निराशा सहवासातील व्यक्तीकडे व्यक्त करतो. या पुस्तकात लेखकाने वर्तमान पुन्हा सादर करून आमच्या जाणिवेतून निसटलेल्या विषयांच्या आणि काळाच्या दूरवरच्या कक्षा, वेदना आणि त्यांचे मर्म, दुसऱ्यांचे दुःख, जीवन आणि मृत्यू यांच्यातला निरंतर संवाद यासाठी वर्तमान पुन्हा सांगण्याचा प्रयत्न केलाय. याबरोबरच मरणासन्न रुग्णांशी टिकवून ठेवलेला संवाद या पुस्तकातून सादर केलेला आहे.
यानंतर संपन्न झालेल्या चर्चेत, वर्षा वैद्य, उषा तोंडचिरकर, प्राचार्य विजयकुमार पाटील, सुरेश विश्वब्रह्मा, प्रतिभा मुळे, प्रा.डॉ. म.ई.तंगावार, डॉ. कांत जाधव यांच्यासह अनेकांनी सहभाग नोंदवला. यावेळी जि.प.प्रा. शाळा, डिगोळ येथे सहाव्या वर्गात शिकणारी बाल वाचक कु.मानवी बिरादार हिने वाचलेल्या छत्रपती शिवाजी महाराज या कृष्णा केळुसकर लिखित पुस्तकाबद्दल माहती सांगितली. अध्यक्षीय समारोप करताना श्रुतिका पाटील म्हणाल्या की, हे पुस्तक नवीन कोणता विचार मांडत नाही तर मानवी जीवनातल्या सर्वात समृद्ध अनुभवाचे प्रत्यक्षदर्शी कथन करतो. आपण मरणाकडे वस्तुनिष्ठपणे कसे पाहायला शिकलं पाहिजे, याबाबत भाष्य केल्या.
शासकीय दुध डेअरीच्या सभागृहात संपन्न झालेल्या या वाचक संवादचे सूत्रसंचालन कु.डॉ. चंद्रभागा सुरेश शिंदे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अर्चना नळगीरकर यांनी करून दिला तर आभार सुचिता अनंतराव कदम यांनी मानले.
