उदयगिरी नेत्र रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, खड्डेच खड्डे, दुरुस्तीचा प्रश्न कायम

0
उदयगिरी नेत्र रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था, खड्डेच खड्डे, दुरुस्तीचा प्रश्न कायम

उदगीर (एल.पी.उगीले) उदयगिरि लायन्स नेत्र रुग्णालयाचे नावलौकिक जागतिक पातळीवर झाले असले तरी, उदगीर नगरपालिकेला त्याचे काही देणे घेणे नाही की काय? असे वाटावे इतपत या नेत्र रुग्णालयाकडे दुर्लक्ष केले जात आहे. विशेष म्हणजे या रुग्णालयाकडे मोठी वर्दळ असताना देखील रस्त्याची दुर्दशा कायम आहे. उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय हे मराठवाड्यातील अग्रगण्य अंधत्व निवारणाचे केंद्र बनत आहे. या रुग्णालयात ग्रामीण भागातील गोरगरिबांना अत्यल्प दरामध्ये नेत्र शस्त्रक्रिया केली जाते. त्या नेत्र रुग्णांना ये जा करण्यासाठी नांदेड बिदर रोड पासून उदय कॉलनी मधील रस्ते दुरुस्त झाले मात्र या रुग्णालयाला जाण्यासाठी चा रस्ता दुरुस्त करावा अशी वेळोवेळी मागणी करून देखील नगरपालिका का दुर्लक्ष करते? हा प्रश्न कायम जनतेच्या मनामध्ये सतावतो आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या रुग्णालयाकडे जाण्यासाठी योग्य रस्ता नसल्यामुळे, विशेषतः नेत्र रुग्णांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हा विषय नगरपालिका प्रशासनाने कित्येकदा ऐकूनही दुर्लक्षित केल्यामुळे परिस्थिती जैसे थे राहिली आहे.
उदयगिरी नेत्र रुग्णालय या रुग्णालयाला जाण्यासाठीचा पूर्ण रस्ता उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो.
पूर्वीपासूनच रस्त्याचा अभाव असल्याने हा प्रश्न अनेक वेळा उपस्थित करण्यात आला. अखेर माजी मंत्री संजय बनसोडे यांनी याची दखल घेत, ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या भागाचा रस्ता तयार करण्यास सांगितले. मात्र, रस्त्याचा केवळ 80% भाग ग्रामपंचायत हद्दीत येत असल्याने, तो भाग तयार करण्यात आला, पण उर्वरित 20% रस्ता हद्दीबाहेर असल्यामुळे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे.
रस्त्याचा उर्वरित भाग पूर्ण करण्यासाठी माजी मंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी उदगीर नगरपरिषदेचे प्रशासक असलेल्या उपजिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते. मात्र, त्या आदेशाला एक वर्ष होऊनही नगरपरिषद प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी, अद्यापही हा रस्ता अपूर्ण अवस्थेत असून, दृष्टीहीन रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी रुग्णालयाचे अध्यक्ष, डॉ. रामप्रसाद लखोटिया यांनी वेळोवेळी नगरपरिषद मुख्याधिकारी आणि प्रशासक यांना लेखी निवेदन दिले आहे. मात्र, सतत दुर्लक्ष होत असल्याने परिस्थितीत काहीही सुधारणा झालेली नाही.
अंधत्व निवारणाचा महायज्ञ चालवलेल्या नेत्र रुग्णालयाकडे जाण्यासाठी रस्ता नसावा, ही अत्यंत शोकांतिका आहे. जागतिक पातळीवरील विविध संघटना कडून शेकडो पुरस्काराने गौरविलेल्या या नेत्र रुग्णालयाला स्थानिक च्या नगरपालिका प्रशासनाने दुर्लक्षित ठेवावे. याबद्दलही उदगीरकरांना नवल वाटू लागले आहे.
हा रस्ता अत्यावश्यक असूनही नगरपरिषद प्रशासनाने या समस्येकडे दुर्लक्ष केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. अपूर्ण रस्त्यामुळे अनेक दृष्टीहीन रुग्णांना धोका पत्करून रुग्णालय गाठावे लागत आहे.आता प्रशासन या समस्येची तातडीने दखल घेणार का? की दृष्टी नसलेल्या रुग्णांचे हाल असेच सुरू राहणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्ता दुरुस्ती त्वरित सुरू न झाल्यास नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
दृष्टी नसलेल्या रुग्णांना योग्य रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषदेने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगरपालिका प्रशासनाकडे आता नगर विकासाचा विचार करणारे मुख्याधिकारी जाधव हे आल्यामुळे कदाचित हा प्रश्न लवकरच निकाल लागेल. अशी अपेक्षा उदगीरकरांना आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!