तिसऱ्या वर्षी रामनवमी महोत्सवाचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) सकल हिंदू धर्माचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांच्या जन्मोत्सवानिमित्त उदगीर शहरात श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रामनवमी महोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवाचे तिसरे वर्ष असून, पूर्वीच्या वर्षांप्रमाणेच हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जाणार असल्याचे संयोजन समितीने कळवले आहे.
श्रीराम प्रतिष्ठानच्या वतीने अयोध्येतील पवित्र शरयू नदीचे जल आणून उदगीरमधील राममूर्तीचा जलाभिषेक केला जातो. मागील दोन वर्षांपासून ही अनोखी परंपरा सुरू असून, रामभक्तां साठी हा भक्तिपूर्ण व भावनिक क्षण ठरत आहे.
रामनवमीच्या दिवशी उदगीर शहरातून भव्य शोभायात्रा व मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत तालुक्यातील हजारो युवक, श्रद्धाळू, महिला, लहान मुले तसेच विविध धार्मिक व सामाजिक संस्था सहभागी होतात. संपूर्ण शहर भगव्या पताकांनी आणि “जय श्रीराम” च्या गजराने दुमदुमून जाते.
रामनवमी महोत्सव श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केला असून, गेल्या दोन वर्षांपासून हा महोत्सव भव्य स्वरूपात पार पडतो. यावर्षी रामनवमी उत्सवाचे नेतृत्व अजय नवरखेले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.
यावर्षीच्या रामनवमी महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रसिद्ध वक्ते वसंत हंकारे यांचे प्रेरणादायी व्याख्यान संपन्न होणार असल्याचे सांगण्यात येते. कार्यक्रम उदगीर शहरातील विद्यावर्धिनी हायस्कूलच्या मैदानावर संपन्न होणार आहे.
रामनवमी निमित्ताने विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये रामायण विषयक प्रश्नमंजुषा, भजन स्पर्धा, श्रीराम रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सतीश पाटील आणि यावर्षीचे मिरवणूक प्रमुख अजय नवरखेले यांनी दिली आहे.
