वनरक्षक सागर पोवार सुवर्ण पदकाचे मानकरी; मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार सन्मान
कोल्हापूर (शिवाप्पा पाटील): वनसंपत्तीचे संरक्षण, संवर्धनाचे प्रभावी आणि उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल कराड 'सह्याद्री व्याघ्र राखीव'चे वनरक्षक सागर सर्जेराव पोवार यांच्या नावाची राज्य शासनाने सुवर्ण पदकासाठी शिफारस केली आहे. श्री. पोवार यांनी वन व्यवस्थापनात नाविन्यपूर्ण, उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुवर्णपदक बहाल करून समारंभपूर्वक गौरविण्यात येणार आहे. सागर पोवार सुवर्ण पदकाचे मानकरी ठरल्याचे समजताच कोल्हापूरकरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वर्गवारी करून त्यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत दरवर्षी सन्मानित करण्यात येते. सांप्रत वर्षीच्या या निवडीमध्ये सागर पोवार यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील अन्य चार वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. वनरक्षक सचिन आप्पासो पाटील (सुवर्ण), प्रतिभा लक्ष्मण पाटील (रजत),
विभागीय वन अधिकारी हरिश्चंद्र सुभाष वाघमोडे (सुवर्ण), वन्यजीव व्यवस्थापनासाठी वनपाल रामदास शंकर घावटे (रजत) तसेच धाडसी, शौर्य आणि प्रगतीच्या दृष्टीने केलेल्या विशिष्ट कार्यासाठी वनमजूर बुधाजी सखाराम कांबळे (सुवर्ण) यांचीदेखील राज्यस्तरीय पदकांसाठी शिफारस करण्यात आली आहे.
यापूर्वीही वन सेवेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सागर पोवार यांना चंदगड तालुका पत्रकार संघाचा ‘आदर्श वन कर्मचारी पुरस्कार – २०२२’ प्राप्त झाला आहे. प्रथम वर्ग न्यायाधीश ए. सी. बिराजदार, न्यायाधीश चारुदत्त शिपकुले यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना सन्मानित करण्यात आले. सागर पोवार हे त्यांच्या नियुक्तीपासून शेतकऱ्यांच्या अडचणी विचारात घेऊन त्यांना वन्य जीवा़च्या संरक्षणाचे धडे देतात. वन विभागाशी निगडित शासन नियमाप्रमाणे अनुज्ञेय असणाऱ्या योजनांची माहिती शेतकरी, मागासवर्गीय समाजबांधव तसेच सर्वसामान्य नागरिकांना देऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तळमळीने काम करतात. मगरींसारख्या आणि अन्य वन्यजीवांना त्यांच्या मूळ अधिवासात सोडणे, अवैध वृक्षतोड, अवैध वाहतूक, अवैध शिकार, अतिक्रमण करणाऱ्यांविरुद्ध विनाविलंब कार्यवाही करुन गुन्हा दाखल करतात आणि कायद्यापुढे कोणीही मोठा नाही हे आपल्या कामातून वनरक्षक सागर पोवार यांनी आजपर्यंत दाखवून दिले आहे.
चंदगड, चांदोली, आंबा आदी परिक्षेत्रांत आपल्या उत्कृष्ट कामाचा चांगला ठसा श्री. पोवार यांनी उमटवला असून त्यांच्या कार्यक्षेत्रांसह केर्ली (ता. करवीर) या त्यांच्या मूळ गाव व परिसरातील नागरिक तसेच सामाजिक, राजकीय प्रशासकीय क्षेत्रांतील अनेक मान्यवरांनीही त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
