परस बागेतील कुक्कुटपालनातून महिला सशक्तिकरण शक्य: प्रा. डॉ. अनिल भिकाने

उदगीर (एल.पी.उगीले)
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर आणि राष्ट्रीय मांस संशोधन संस्था, हैद्राबाद यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय परसातील कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर येथे संपन्न झाले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून प्रा. डॉ. अनिल भिकाने, संचालक, विस्तार शिक्षण, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर हे लाभले होते. डॉ. भिकाने यांनी सदर प्रशिक्षणाचा दूरगामी लाभ घेऊन आर्थिक उन्नती कशी साधता येईल? तसेच महिला सशक्तीकरण कसे करता येईल? याबाबत प्रशिक्षणार्थींना अनेकविध उदाहरणे देऊन उद्बोधक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. नंदकुमार गायकवाड यांनी भूषविले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी महाविद्यालयातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या विविध प्रशिक्षणांचा जास्तीत जास्त लाभ परिसरातील पशुपालकांनी घ्यावा, याबाबत प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. सदर प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. राम कुलकर्णी यांनी प्रशिक्षणाचे प्रास्ताविक केले.
मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना मोफत साहित्य वाटप तसेच प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. डॉ. मत्स्यगंधा पाटील, डॉ. संभाजी चव्हाण, डॉ. राम कुलकर्णी आणि डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी प्रशिक्षणार्थींना विविध विषयांवर व्याख्याने दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. वेदांत पांडे यांनी केले. डॉ. नरेंद्र खोडे, डॉ. शरद आव्हाड, डॉ. विवेक खंडाईत आणि डॉ. प्रकाश घुले यांनी सहसमन्वयक म्हणून कामगिरी पार पाडली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रकाश घुले यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमास पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. विनोद जाधव, डॉ. ओम होळकर, कौशल मोरे यांचे सहकार्य लाभले.