उदयगिरीत कन्नड विभागाच्या वतीने एक दिवसीय आंतर-विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र
उदगीर (एल.पी.उगीले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात कन्नड विभागाच्या वतीने ‘वचन साहित्य आणि मानवी मूल्य’ या विषयावर एक दिवसीय आंतर विद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्र दिनांक 22 मार्च 2025 रोजी संपन्न झाले. या राष्ट्रीय चर्चासत्रात कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र यासारख्या विविध राज्यातून कन्नड अभ्यासक सहभागी झाले होते. राष्ट्रीय चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी हे होते. यावेळी व्यासपीठावर उदगीर येथील हावगीस्वामी मठाचे मठाधीश शंभूलिंग शिवाचार्य महाराज, धारवाड येथील कर्नाटका विद्यापीठाच्या प्रकाशन विभागाचे सहसंचालक डॉ. सिद्धप्पा एन., बिदर जिल्ह्याचे शरण साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्रो. शंभुलिंग कामन्ना, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथील पाली विभागप्रमुख डॉ. भीमराव पाटील, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती कार्याध्यक्ष माधव बावगे, संस्था उपाध्यक्ष डॉ. रेखा रेड्डी, मनोहरराव पटवारी, महादेव नौबदे, बसवराज पाटील मलकापूरकर, प्रशांत पेन्सलवार, शिवराज वल्लापुरे, प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, उपप्राचार्य डॉ. एस. एन. हल्लाळे यांची विशेष उपस्थिती होती.
यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना धारवाड येथील कर्नाटका विद्यापीठाचे सहसंचालक डॉ. सिद्धप्पा एन. म्हणाले, महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये आयोजित वचन साहित्यावरील राष्ट्रीय परिषदेची नोंद विद्यापीठ व विद्यापीठ अनुदान आयोगाकडून घेतली जाईल. भारतीय संविधानामध्ये प्रविष्ट करण्यात आलेल्या अनेक बाबी महात्मा बसवेश्वरांच्या वचन साहित्यात दिसून येतात. प्रो. शंभुलिंग कामन्ना म्हणाले, राष्ट्रीय ऐक्य व बंधुभाव निर्माण करण्याचे कार्य वचन साहित्याने केले आहे तसेच वर्तमानकालीन व भविष्यकालीन सर्व प्रश्नांचे उत्तर वचन साहित्यातून सोडविले जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी वचन साहित्याचे वाचन व अनुकरण करावे, असे मत व्यक्त केले. डॉ. भीमराव पाटील म्हणाले, राजेशाहीमध्ये लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवण्याचे कार्य महात्मा बसवेश्वर व त्यांच्या वचन साहित्याने केले आहे. लोककल्याणकारी राज्याची निर्मिती वचन साहित्यातून झाली असून मानवी मूल्य जोपासण्याचे कार्य वचन साहित्य करत आहे. हावगीस्वामी मठाचे मठाधीश शंभूलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले वचन साहित्याची निर्मिती अनुभवातून झाली आहे. वचन साहित्यातून भेदभाव नष्ट करण्याचे व सर्वांप्रती ममत्व, बंधुभाव जोपासण्याचे कार्य केले जाते. त्यामुळे सर्वांनी समता व बंधुतेने वागावे, असे आवाहन उपस्थितांना केले. अध्यक्षीय समारोप करताना महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी म्हणाले, वचन साहित्याचा प्रचार-प्रसार अधिक होण्यासाठी वारंवार अशा राष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन मोठ्या प्रमाणात करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के यांनी तर पाहुण्यांचा परिचय कन्नड विभाग प्रमुख डॉ. रमेश मुलगे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. एम. पी. मानकरी यांनी तर आभार डॉ. व्ही. पी. चन्नाळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. बालाजी होकरणे, डॉ. प्रवीण अंबेसंगे यांनी परिश्रम घेतले.
