लीनेस क्लब तर्फे महिला दिन उत्साहात साजरा
उदगीर (एल.पी.उगीले)
महिला या पूर्ण कुटुंबाच्या आधारस्तंभ असतात, म्हणूनच तर महिलांनी निरोगी राहणे आवश्यक आहे. म्हणून लीनेस क्लब सदस्य अपर्णा नितीन कोंडापुरे यांनी खास महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर, आरोग्य विषयक व्याख्यानाचे आयोजन केले होते . कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून तसेच दीप प्रज्वलन करून झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वर्षा पाटील यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. देवराज पाटील व लिनेस क्लब माजी अध्यक्षा सुनंदा कुलकर्णी होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लीनेस क्लबचे अध्यक्ष प्राचार्य रेखा तरडे होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले प्रा. देवराज बिरादार (कोल्हापूर ) यांनी आरोग्याचे चार स्तंभ याबद्दल माहिती दिली. पहिला स्तंभ व्यायाम, दुसरा झोप, तिसरा विचारसरणी आणि चौथा आहार तसेच निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन पर व्याख्यान दिले. त्यानंतर आरोग्य तपासणी झाली. अनेक महिलांनी त्याचा लाभ घेतला. त्यानंतर रेखा तरडे यांनी अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीना तोवर यांनी केले. या कार्यक्रमात लीनेस सदस्या तसेच इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी वर्षा पाटील , शुभांगी पाटील आणि भाग्यश्री मेनकुदळे यांनी विशेष परिश्रम घेतले.त्यानंतर एकमेकांना प्रेमाचे रंग लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रोजेक्ट प्रमुख अपर्णा कोंडापुरे यांनी सगळ्यांचे आभार मानले.
