परिमंडळ वनाधिकारी सागर पोवार सुवर्ण पदकाने सन्मानित
भूमिपुत्राच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्ह्याला अभिमान
कोल्हापूर (प्रतिनिधी): आंबा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक सागर सर्जेराव पोवार यांना वनसेवेतील उत्कृष्ट कार्याबद्दल सन २०२१-२२ या कालावधीसाठी राज्यस्तरीय सुवर्ण पदक बहाल करण्यात आले. २१ मार्च या जागतिक वन दिनाचे औचित्य साधून त्यांना राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन समारंभपूर्वक सन्मानित करण्यात आले.
वन संरक्षणाचे काम प्रभावीपणे करणारे सागर पोवार यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी त्यांच्या नावाची शासनाने सुवर्ण पदकासाठी शिफारस केली. सदर शिफारसीस अनुलक्षून वनरक्षक श्री. पोवार यांना शुक्रवार (ता. २१) रोजी वाशी (नवी मुंबई) येथील सांस्कृतिक सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत सुवर्ण पदक बहाल करण्यात आले. यावेळी राज्याचे अप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख सौमिता विश्वास प्रधान, एस. श्रीनिवास रेड्डी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक संशोधन शिक्षण व प्रशिक्षण महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच या देदीप्यमान सोहळ्यास महाराष्ट्रातील सर्व सीसीएफ, एसीएफ डीसीएफ, डीएफओ, आएफओ, आरओ, एफजी हेदेखील उपस्थित होते.
'माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड, आजरा, भुदरगड, राधानगरी, गगनबावडा तसेच शाहूवाडी तालुक्यांमधील आसपासच्या सृष्टीतील प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष यांची वन्यजीव विविधता कमालीची मोहित करणारी, थक्क करणारी आहे. सह्याद्रीतील वन्यजीवांप्रती आपल्या हृदयात अपार कारुण्यभाव असून वन्यजीव तसेच पर्यावरण संवर्धनासाठी कृतिशील उपक्रम राबवणे ही माझी नुसती जबाबदारी नसून कर्तव्य आहे', अशी भावोत्कट प्रतिक्रिया सुवर्णपदकाचे मानकरी सागर पोवार यांनी आमचे प्रतिनिधी शिवाप्पा पाटील यांच्याशी बोलताना व्यक्त केली. भूमिपुत्राचा थाटामाटात झालेला सन्मान पाहून कोल्हापूरकरांचा अभिमानाने ऊर भरून आला.
