अंधांसाठी व डोळस कार्यकर्त्यांसाठी दोन दिवसीय स्वयंसिध्दता आणि सहसंवेदना सजगता कार्यशाळेचे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) उदगीर येथील अरुणा अभय ओसवाल रिसर्च सेंटर फॉर द ब्लाइंड आणि उदयगिरी लायन्स नेत्ररूग्नालय उदगीर या संस्थांनी अंधांसाठी व डोळस कार्यकर्त्यांसाठी दिनांक 28 व 29 मार्च 2025 रोजी दोन दिवसीय स्वयंसिध्दता आणि सहसंवेदना सजगता कार्यशाळेचे आयोजन केले आहे. अंध व्यक्तींना दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करून आपले आयुष्य सुलभ आणि सुरक्षित पणे जगता यावे, यासाठी आतापर्यंत महाराष्ट्रातील पुणे,मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव,अहमदनगर, लातूर, अकोला, अमरावती,सातारा, कोल्हापूर, नागपूर, रत्नागिरी, हिंगोली,पालघर आणि यवतमाळ जिल्ह्यांत 67 आणि मध्यप्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे एक अशा 68 स्वयंसिध्दता आणि सहसंवेदना सजगता कार्यशाळा त्यात सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींना अत्यंत उपयुक्त ठरल्या आहेत.उदगीर परिसरातील अनेक अंध व्यक्तींच्या मागणीवरून दुसऱ्यांदा ही कार्यशाळा उदगीर शहरामध्ये होत आहे.यापूर्वी 2023 साली उदगीर येथे पहिली कार्यशाळा झाली होती. या कार्यशाळेत पांढऱ्या काठीची माहिती व उपयोग,पांढरी काठी शास्त्रशुद्ध पद्धतीने वापरण्याचे प्रशिक्षण देऊन प्रत्यक्ष वापर करण्याचा सराव, इतर ज्ञानेंद्रियांचा वापर सक्षमतेने कसा करायचा याबद्दलची माहिती व प्रशिक्षण, स्पर्शज्ञानाने विविध पदार्थ कसे ओळखायचे? हे सर्व प्रशिक्षण देऊन प्रशिक्षणार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरणही करण्यात येणार आहे.हे सर्व प्रशिक्षण स्वतः स्वागत थोरात देणार आहेत. तर स्वरूपा देशपांडे या कार्यशाळेच्या समन्वयक व सहाय्यक प्रशिक्षक आहेत.या दोन दिवशीय कार्यशाळेची वेळ दोन्ही दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 अशी असेल.अंधांच्या वैयक्तिक जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या या स्वयंसिद्धता कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मराठवाड्यातील अंधांनी चुकवू नये, असे संस्थेचे प्रमुख डाॅ.रामप्रसाद लखोटिया यांनी आवाहन केले आहे.तसेच या कार्यक्रमास बाहेरूण येणारे अंध विद्यार्थी यांना मोफत राहाण्याची व जेवणाची व्यवस्था उदयगिरी लाॅयन्स धर्मादाय नेत्ररूग्नालय उदगीर च्या वतिने करण्यात आली आहे.
या कार्यशाळेबद्दल आधिक माहितीसाठी 7498813613 या मोबाईल क्रमांकावर श्री. राजेंद्र चव्हाण यांच्याशी किंवा 9970273834 या मोबाईल क्रमांकावर श्री.राजकुमार मुक्कमवार यांच्याशी किंवा 8788522878 या मोबाईल क्रमांकावर श्री.अजय भालेराव यांच्याशी संपर्क साधावा. असे संयोजकांनी कळवले आहे.
