नागरी समस्यासह पालिकेच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

0
नागरी समस्यासह पालिकेच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन

उदगीर (एल. पी. उगिले)
उदगीर नगरपालिकेच्या एकूण कामकाजाच्या विरोधामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील नागरी सुविधा सोडवाव्यात, तसेच पालिकेमध्ये चालू असलेल्या भोंगळ कारभाराच्या विरोधामध्ये निदर्शने करत धरणे आंदोलन करण्यात आले.
उदगीर नगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये नळपट्टी व घरपट्टी मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. ही जाचक वाढ तात्काळ मागे घेण्यात यावी. शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा. लोक वाटा आणि वाढीव निविदा दराच्या तरतूद होईपर्यंत भुयारी गटार योजनेला स्थगिती द्यावी, किंवा सदरील निविदा रद्द करावी. एसटीपी साठीची जागा निश्चित होऊन नगरपालिकेच्या ताब्यात येईपर्यंत भुयारी गटाराची योजना चालू करू नये. शहरातील भुयारी गटारीचे काम अंतिम होईपर्यंत कोणत्याही योजनेअंतर्गत रस्ते व नाली बांधकामावर निधी खर्च करू नयेत. नगर विकासाचा निधी ग्रामीण भागात खर्च करणाऱ्या अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात यावी. यासह इतर मागण्याचे निवेदन आंदोलनकर्त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.
जिल्ह्यातील इतर नगरपालिकेच्या तुलनेमध्ये पाणी कमी दिवस उदगीर शहराला मिळते, मात्र त्यासाठी लावण्यात येणारी पाणीपट्टी कर हा अत्यंत जास्त आहे. तो अन्यायकारक आहे, तो तात्काळ रद्द करावा. अशी ही मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर कार्याध्यक्ष गजानन सताळकर, शंकर मुक्कावार, समाजवादी नेते रंगा राचुरे, विधीज्ञ निशांत वाघमारे, ज्ञानेश्वर पाटील, अजय शेटकर, धनाजी बनसोडे, आतिश गायकवाड, सुशांत बनसोडे, गोविंद भालेराव, अभिनव गायकवाड, माधव उदगीरकर, दुर्गाप्रसाद कुलकर्णी, भागवत तलवारे, नामदेव भोसले, महादेव भंडारे, बबन सुळकेकर यांच्यासह विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सध्या प्रशासकीय कार्यकाळ चालू असल्याने एकूण नगरपालिकेच्या कामकाजावर कोणाचेही बंधन नसल्याने मनमानी प्रमाणे कर वाढ झालेली असल्याचे आरोपही करण्यात आले आहेत.
प्रशासकीय कार्यकाळात लोकांवर अतिरिक्त कर लादले जाऊ नयेत, अशी आग्रही मागणी करतानाच पाणीपुरवठा नियमित केला जावा. असेही आग्रही निवेदन याप्रसंगी देण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!