पशुवैद्यकीय महाविद्यालयात दुग्धव्यवसाय प्रशिक्षण संपन्न

0
पशुवैद्यकीय महाविद्यालयात दुग्धव्यवसाय प्रशिक्षण संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले)
दुग्धव्यवसाय प्रशिक्षणातून नवीन उद्यमशील पशुपालक घडतील. व्यवसाय करतांना आपल्या परिसरातील पशुपालकांना आज प्रशिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी व्यवसाय मार्गदर्शन करतील, आणि परिसरात दुग्धव्यवसाय वाढीसाठी हातभार लावतील, अशी टिपणी महाविद्यालयाचे प्रभारी सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक देवांगरे यांनी तीन दिवसीय दुग्धव्यवसाय प्रशिक्षणाच्या समारोप कार्यक्रमात व्यक्त केली. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर आणि राष्ट्रीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांचे संयुक्त विद्यमाने ‘अनुसूचित जाती उपयोजना’ अंतर्गत लाभार्थ्यांमध्ये पशुधन क्षेत्रात शास्त्रोक्त ज्ञानाचे बळकटीकरण आणि विकास या अंतर्गत ‘दुग्धव्यवसाय’ प्रशिक्षण दिनांक १७ ते १९ मार्च दरम्यान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले. या प्रशिक्षणामध्ये पशुपालकांना दुधाळ गायी-म्हशींच्या जाती, उत्तम जनावरांची निवड, आहार व्यवस्थापन, मुरघास निर्मिती प्रात्यक्षिक, अझोला प्रात्यक्षिक, प्रजनन व्यवस्थापन, महत्वाचे संसर्गजन्य व उत्पादकतेशी निगडीत आजार, परजीवी व त्यांचे नियंत्रण, विषबाधा व त्यावरील उपाययोजना, विविध आजारावरील प्रथमोपचार, पशुधन विमा व दुग्धजन्य पदार्थ निर्मिती या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. प्रशिक्षण समारोपावेळी सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र, प्रशिक्षण कीट, मुरघास बनविण्यासाठी मुरघास ब्याग, पशुखाद्य व खनिजक्षार मिश्रण यांचे वाटप करण्यात आले. या प्रशिक्षणा चा लाभ नागलगाव, कासराळ, लिंबगाव परिसरातून एकूण ५० स्री व पुरुष पशुपालकांनी घेतला. प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी प्रकल्प समन्वयक डॉ. राम कुलकर्णी, प्रकल्प सहसमन्वयक आणि प्रशिक्षण समन्वयक डॉ. रविंद्र जाधव, प्रकल्प सहसमन्वयक डॉ. प्रफुल्ल पाटील यांनी परिश्रम घेतले. तसेच, पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. विनोद जाधव, डॉ. ओम होळकर आणि कर्मचारी श्री. संजय भोसले, श्री. तुळशीदास, श्री. नागनाथ यांनीही मेहनत घेतली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!