लाच लुचपत प्रतिबंधक पथकाची लागली चाहूल!!भाद्याच्या ज्ञानेश्वर जमादारने दिली त्यांना हुल !!

0
लाच लुचपत प्रतिबंधक पथकाची लागली चाहूल!!भाद्याच्या ज्ञानेश्वर जमादारने दिली त्यांना हुल !!

लातूर (एल.पी.उगीले)
लातूर परिक्षेत्रामध्ये आता बऱ्यापैकी लाचखोरांना आळा बसू लागला आहे. तरी देखील पोलिस आणि महसूल प्रशासनातील काही लाचखोर प्रवृत्तींना अजूनही खाज कायम आहे. असे दिसून येत आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला पोलीस उपाधीक्षक म्हणून संतोष बर्गे रुजू झाल्यानंतर त्यांनी राबवलेल्या वेगवेगळ्या शैलीमुळे लाचखोर प्रवृत्तीला आळा बसला आहे. असे असताना देखील भादा पोलीस स्टेशन येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेले ज्ञानेश्वर विनायक जमादार यांनी मात्र पोलीस स्टेशन भादा येथील एका दाखल गुन्ह्यामध्ये संशयीत आरोपीला अटक न करता नोटीस देऊन सोडतो, पुढे तपासात देखील सहकार्य करतो. असे आश्वासन दिले, मात्र त्या मोबदल्यात तीस हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगून लोकसेवक पोलीस शिपाई ज्ञानेश्वर विनायक जमादार यांनी लाचेची मागणी करत असल्यासंदर्भात तक्रारदार यांनी 12 मार्च 2025 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या लातूर कार्यालयात तक्रार दाखल केली होती. प्राप्त तक्रारीनुसार त्याच दिवशी शासकीय पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी ही केली होती. यातील लोकसेवक जमादार यांनी तक्रारदार यांना तुला अटक करत नाही, नोटीस देऊन सोडून देतो. असे म्हणून पंचा समक्ष तीस हजार रुपये लाचेची मागणी करून पाच हजार रुपये 8 मार्च रोजी घेतल्याचे मान्य करून पुढील रक्कम तडजोडीअंती 20,000 रुपये लाच स्वीकारण्यास सहमती दर्शवली. त्यावरून पुन्हा 13 मार्च आणि 17 मार्च तसेच 20 मार्च रोजी लाच स्वीकृती सापळा कार्यवाही आजमावली असता, आरोपी लोकसेवक ज्ञानेश्वर विनायक जमादार यांना संशय आल्याने त्यांनी जाणीवपूर्वक लाच रक्कम स्वीकारण्याचे टाळले. म्हणून आरोपी लोकसेवक पोलीस शिपाई ज्ञानेश्वर विनायक जमादार यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन विवेकानंद चौक लातूर येथे गुरन 205/ 25 कलम 7,7 (अ) भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे नांदेड परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संजय तुंगार यांच्या मार्गदर्शनानुसार लाच लुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे, पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली, पोलीस निरीक्षक अनवर मुजावर, पोलीस हेडकॉन्स्टेबल दामटे, भागवत कठारे, भीमराव आलुरे, शाम गिरी, संदीप जाधव, मंगेश कोंढरे, दीपक कलवले, गजानन जाधव, किरण गंभीरे, महिला पोलीस कॉन्स्टेबल शहाणाज पठाण, पो. का. असलम सय्यद, संतोष क्षीरसागर यांच्या पथकाने पार पाडली.
लातूर विभागीय लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयातील कोणत्याही कामासाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्का व्यतिरिक्त जास्तीचे शुल्क शाबाशी म्हणून किंवा बक्षीस म्हणून कोणता अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी इसम, दलाल मागणी करत असेल तर तात्काळ लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन करण्यात आले आहे. तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही जाहीर केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!