छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात बीकॉम तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयात बीकॉम तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ देण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिनेट सदस्य तथा ग्रंथपाल डॉ.विष्णू पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.शि.य. होनकर,प्रा.डॉ.एस.बी.कातकडे उपस्थित होते. तर व्यासपीठावर वाणिज्य विभाग प्रमुख डॉ.ह.वा. कुलकर्णी,प्रबंधक बालाजी पाटील यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भित्तिपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले.
श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील वाणिज्य विभागातील सेवा निवृत्त प्रा.शि.य.होनकर यांच्या हस्ते भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आली. होनकर यांनी बी कॉम तृतिय वर्ष या वर्गाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी होनकर म्हणाले,मी जीवनामध्ये अनेक चांगले विद्यार्थी घडकले.त्यामध्ये प्रा.ह.वा. कुलकर्णी, प्रा.सगर प्रा.तानशेटे एन.एच,अशी असंख्य नावे डोळ्यापुढे येतात. पुढे बोलताना ते म्हणाले,कुलकर्णीनी मला गुरु मानले आहे,पण या क्षेत्रामध्ये विद्यार्थी माझा गुरु झाला आहे.मला त्या काळात जे जमलं नाही ते कुलकर्णींनी चांगल्याप्रकारे करून दाखवले आहे.
एखाद्या गुरुचा त्याच्या शिष्याकडून पराभव होत असेल तर तो गुरु महान असतो. कारण मी कसा आहे, यापेक्षा माझी निर्मिती म्हणजे डॉ.ह.वा. कुलकर्णी माझ्यापेक्षा सरस आहेत, याचा अर्थ विद्यार्थी श्रेष्ठ असेल तर तो गुरुचा गौरव आहे. असे मी समजतो. विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार केला पाहीजे. कौशल्य निर्माण केले पाहिजे. तुम्हाला मार्गदर्शन करणारी एक चांगली टीम या महाविद्यालयात आहे. पूर्वी श्री हावगीस्वामी महाविद्यालय वाणिज्य शाखेमध्ये अग्रेसर होते.आज कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयाचे नावलौकिक वाढविले आहे.
यावेळी प्रा.डॉ.एस.बी कातकडे यांनी विद्यार्थ्यांनी चांगले विचार करावेत, लाजू नये, निंदा आणि अपमान सहन करण्याची क्षमता ठेवावी.नेहमी प्रयत्नशील असावे असेही म्हटले. तर अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ.विष्णू पवार म्हणाले, नॅकच्या मानांकनात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांचे अभिप्राय मोलाचे ठरले. तसेच असंख्य विद्यार्थी कमवा आणि शिका योजने अंतर्गत काम करून शिकतात. त्यां बद्दल त्यांचे कौतुक प्राणि अभिनंदन केले.
या प्रसंगी प्रा.डॉ.डी.बी. कोनाळे, प्रा.खरात, प्रा.बेद्रे प्रा.पवार, प्रा.चिवटे, प्रा. चिंतलघट आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिवटे यांनी,प्रास्ताविक प्रा.ह.वा. कुलकर्णी यांनी तर आभार कु.तोंडारे हिने मानले.
