भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) – भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उदगीर शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातील विविध भागांमध्ये सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरू होती.
सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी सामूहिकरित्या मानवंदना अर्पण केली. यावेळी शहरातील सर्वच राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिवादन करून बाबासाहेबांना आदरांजली वाहिली.
सायंकाळी ७ वाजता शहरातील विविध भागांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या मिरवणुका मोठ्या जल्लोषात काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये हजारो बौद्ध बांधवांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकांच्या तालावर आणि घोषणांच्या निनादात संपूर्ण शहर सामाजिक ऐक्याने न्हालं होतं.या मिरवणुकी दरम्यान शहरातील अनेक समाजसेवी संस्थांनी अन्नदान, पाणी वाटप तसेच शीतपेयांचे वाटप केले. काही संस्थां कडून पुष्पवृष्टी करून मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आपापल्या पद्धतीने मिरवणुकीतील सहभागी पथकांचे स्वागत व सत्कार केले.शिस्तबद्ध मिरवणूक, सामाजिक सलोखा आणि जनसहभागामुळे यंदाची आंबेडकर जयंती विशेष लक्षवेधी ठरली.