उदयगिरीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित, संपादित ग्रंथांचे प्रदर्शन
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय, उदगीर येथे समता सप्ताहानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित, संपादित तसेच त्यांच्यावर लिहिलेल्या ग्रंथांचे भव्य ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सदस्य प्रा. मनोहरराव पटवारी, प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक बी. एम. खंदारे, प्राचार्य डॉ. आर. के. मस्के यांच्या हस्ते करण्यात आले. या ग्रंथप्रदर्शनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय विचार मांडणारे दुर्मिळ ग्रंथ, शोधनिबंध, चरित्रात्मक पुस्तके, संविधान निर्मिती संदर्भातील लेखन यांचा समावेश होता. विशेषतः जनता पत्रातील लेख, धर्मांतराची भीमगर्जना, अस्पृश्य मूळचे कोण आणि ते अस्पृश्य कसे बनले, पुणे करार, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच लेखन आणि भाषण, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्मच का स्वीकारला यासारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा समावेश आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, ग्रंथालय कर्मचारी आणि अभ्यागतांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. प्रदर्शनाचे आयोजन ग्रंथालय विभागाच्यावतीने करण्यात आले. ग्रंथपाल प्रा. डॉ. लक्ष्मीकांत पेन्सलवार यांच्या नेतृत्वाखालीखाली हे प्रदर्शन यशस्वीपणे पार पडले. समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आयोजित केलेला या उपक्रमाचा सर्वांनी लाभ घेतला.
