कोतवाल मरे ला लाचेची सुटली हाव !!एसीबीच्या धडक कारवाईत गेला बेभाव !!

लातूर (ऍड. एल.पी.उगीले)
लाचखोरीचे ग्रहण प्रामुख्याने महसूल खात्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाणवू लागले आहे. महसूल प्रभागातील शेवटचे टोक असलेल्या कोतवाल सारख्या मानधनावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला देखील आता लाचेची हाव सुटली आहे. मात्र दुर्दैवाने लातूर जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला अत्यंत कर्तव्य कठोर आणि धडक कारवाई करणाऱ्या पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे हे आल्यामुळे संपूर्ण लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गतिमान झाला आहे.
लाचखोरीला व्यसन घालण्याच्या तयारीत असलेल्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कामगिरीची जगजाहीर माहिती होत असताना देखील, राहुल बालाजी मरे (या 37 वर्ष वयाच्या) कोतवाल यांची नेमणूक तहसील कार्यालय निलंगा तालुका निलंगा जिल्हा लातूर येथे आहे. वास्तविक पाहता कोतवाल यांची गाव पातळीवरील कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी महसूल प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाकडून दिले जाणारे आदेश गावपातळीवरील पोलीस पाटलांना किंवा संबंधित व्यक्तींना पोहोचत करणे, किंवा पोलीस पाटलांचा संदेश परिक्षेत्रातील पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचता करणे यासाठी त्यांची नियुक्ती असते, त्यासाठी त्यांना बऱ्यापैकी मानधन ही मिळते. असे असताना देखील त्यांनी बिनधास्तपणे तक्रारदार यांना तहसीलदारांचा आदेश पोहोचता करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच मागून सरकारी पंचा समक्ष लाच स्वीकारली आहे. त्यामुळे त्यांच्यावर रीतसर कारवाई ही करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलीस प्रशासनाकडून हाती आलेली माहिती अशी की, यातील तक्रारदार यांची आई ज्या शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अजनी (बुद्रुक) येथील रहिवासी आहेत. त्यांनी त्यांच्या वडिलांचे नावे मौजे शिरोळ वांजरवाडा तालुका निलंगा येथील वडिलोपार्जित जमीन सर्वे नंबर 377 व 369 मधील शेत जमीन संदर्भात वाटणी होऊन ताबा मिळण्यासाठी निलंगा येथील दिवाणी न्यायालयात आरसीसी नंबर 117/ 2009 अन्वये दावा दाखल केला होता. सदरील दाव्यात न्यायालयाने तक्रारदार यांच्या आईच्या बाजूने निकाल दिलेला आहे. सदर निकालाविरुद्ध तक्रारदारांचे आईचे भाऊ श्री बबन निवृत्ती जाधव यांची मुलगी माधवी जाधव हिने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये रिट पिटीशन नंबर 9870/2023 अन्वये अपील केले असता, सदरील अपील उच्च न्यायालयाने 3 जानेवारी 2025 रोजी फेटाळले आहे.
त्या निकालावरून तक्रारदार यांनी दिनांक 27 मार्च 2025 रोजी तहसीलदार निलंगा यांना उच्च न्यायालय औरंगाबाद येथील आदेशाची प्रत जोडून शेत जमिनीचा ताबा देणे बाबत विनंती अर्ज सादर केला होता. तक्रारदार यांच्या अर्जावर तहसीलदार निलंगा यांनी निर्गमित केलेल्या आदेशाची छायांकित प्रत देण्यासाठीचे कामासाठी आरोपी राहुल बालाजी मरे यांनी तक्रारदार यांना एक हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांना कोतवाल राहुल मरे हे मागत असलेली रक्कम लाच असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या संदर्भामध्ये लातूर येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार नोंदवली. 22 एप्रिल 2025 रोजी तक्रार नोंदवल्यानंतर या विभागाच्या वतीने या तक्रारीची शहानिशा आणि पडताळणी करण्यासाठी सापळा रचला असता आरोपी राहुल मरे यांनी मौजे शिरोळ वांजरवाडा तालुका निलंगा येथील जमीन सर्वे नंबर 333 आणि 369 मधील जमिनीचे तक्रारदार यांच्या आईच्या बाजूने कलम 54 सीपीसी अन्वये तहसीलदार निलंगा यांनी निर्गमित केलेल्या आदेशाची छायांकित प्रत देण्यासाठीच्या कामासाठी एक हजार रुपयांची मागणी करून, लाचेची रक्कम स्वतः स्वीकारण्यासाठी संमती दिली, ही संमती मिळाल्यानंतर लाचेची पडताळणी झाली. तेव्हा सापळा कारवाई करून पंचांच्या समक्ष राहुल बालाजी मरे यांनी तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम 1000 रुपये स्वतः स्वीकारली आहे. आरोपी राहुल मरे यांना लाचेच्या रकमेसह ताब्यात घेण्यात आले. आरोपी राहुल बालाजी मरे यांच्या विरुद्ध कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे निलंगा पोलीस स्टेशन येथे रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई ही सापळा अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूरचे पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर अन्वर मुजावर यांच्या पथकाने पूर्ण केली आहे. या कारवाईसाठी मार्गदर्शक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक संदीप पालवे आणि अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड परिक्षेत्राचे डॉ. संजय तुंगार यांच्या सूचनेनुसार कारवाई यशस्वी केली आहे.
लाचखोरांना योग्य धडा शिकवण्या साठी पोलीस उपाधीक्षक संतोष बर्गे अत्यंत तत्परतेने कारवाई करत असून जिल्ह्यातील जनतेच्या मनामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाबद्दल विश्वास निर्माण करण्यात ते बऱ्यापैकी यशस्वी झाले आहेत. लातूर जिल्ह्यातील कोणत्याही शासकीय किंवा निमशासकीय कार्यालयात जर कोणता अधिकारी किंवा कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने कोणीही व्यक्ती, दलाल, एजंट शासनाने ठरवून दिलेल्या शुल्काच्या व्यतिरिक्त रक्कम मागत असेल तर त्यांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी. तक्रारदार यांचे नाव गोपनीय ठेवले जाईल. असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.