अवकाळी पावसाचा तडाखा, फळबागा आणि आंब्याचे मोठे नुकसान
उदगीर (एल.पी.उगिले)
तालुक्यातील ग्रामीण भागात संध्याकाळी अचानक अवकाळी पावसाचे आगमन झाले. उदगीर विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आणि उदगीर शहरातही अवकाळी पावसाचा तडाखा बसला. या पावसामुळे आमराईचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाने पुन्हा आर्थिक संकटात लोटले आहे. उन्हाची तीव्रता वाढत असताना या अवकाळी पावसामुळे थोडासा गारवा निर्माण झाला असला तरी, शेतकरी, बागायतदार आणि आंब्याचे व्यापारी यांना मात्र चांगलीच झळ बसली आहे. त्यासोबतच उन्हाळी पिकांना मोठा फटका बसला आहे.
उदगीर तालुक्यात अनेक ठिकाणी केशर आंबा, मलगोबा आंबा आणि गावरान आंबे मोठ्या प्रमाणात लागले होते, मात्र यापूर्वी झालेल्या वादळी पावसामुळे काही प्रमाणात पडझड झाली होती. आज पुन्हा या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात आंब्याचे नुकसान झाले आहे. उदगीर तालुक्यातील इस्लामपूर, वाढवणा, हळी, हंडरगुळी या भागात पाऊण तासापर्यंत वादळ आणि पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसाचे प्रमाण महसूल खात्याच्या वतीने नोंद केलेले कमी असले तरी, त्या पावसामुळे झालेले नुकसान मोठे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल की नाही? यासंदर्भात साशंकता निर्माण झाली आहे.
