पशुधन आरोग्यसेवेत गुणवत्ता राखण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज – डॉ. नंदकुमार गायकवाड

उदगीर (एल पी उगिले) जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्य परिसंवादाचे आयोजन पशुवैद्यक महाविद्यालय उदगीर येथे करण्यात आले होते. या परिसंवादात सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, पशुवैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञ, प्राध्यापक, तंत्रज्ञ आणि क्षेत्रात कार्य करणारे पशुवैद्यक या सर्वानी सामूहिक प्रयत्न केले तरच पशुधन आरोग्यसेवेत उच्चतम गुणवत्ता राखता येईल. पशुवैद्यकाच्या समर्पणाची, कौशल्याची आणि प्राण्यांच्या सेवेत त्यांनी बजावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेची दखल घेण्यासाठी दरवर्षी जागतिक पशुवैद्यकीय दिन साजरा केला जातो.
याप्रसंगी मंचावर प्रमुख अतिथि म्हणून डॉ. आर. डी. पडिले, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग, नांदेड, डॉ. पि. पि. घुले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, नांदेड, आणि डॉ. एस. जी. शिंदे, उपायुक्त पशुसंवर्धन विभाग, लातूर हे उपस्थित होते. प्रमुख अतिथि डॉ. पडिले, डॉ. घुले आणि डॉ. शिंदे यांची या प्रसंगी समयोचित मार्गदर्शने झाले.
प्रास्ताविक डॉ. संजीव पिटलावार, आयोजन समिति अध्यक्ष यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.मत्स्यगंधा पाटिल यांनी केले. या प्रसंगी डॉ. अविराज राजे, पशुधन विकास अधिकारी, बारामती यांनी पारंपारिक वैद्यक शास्त्राबरोबर होमिओपॅथी कसे प्रभावी ठरू शकते, याबाबत सखोल विश्लेषण केले. डॉ.नरेश कुलकर्णी, विपणन व्यवस्थापक, अलेम्बिक फार्मा, सचिन कुलकर्णी, विभागीय व्यवस्थापक, इन्टास फार्मा आणि सतीश तावरे, विक्री व्यवस्थापक, म्यानकाइंड कंपनी यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले. जागतिक पशुवैद्यक दिनानिमित्य परिसंवादाव्यतिरिक्त रेबिज जनजागृती अभियान, जानापुर येथे लसिकरण आणि विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. निबंध स्पर्धेत तेजस्विनी चव्हाण हिने प्रथम, सुलताना शेख हिने द्वितीय तर तेजस पवार याने तृतीय क्रमांक पटकाविला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
डॉ. सुरेश घोके आयोजन समिति सचिव यांनी आभार प्रकट केले.
परिसंवादात नांदेड आणि लातूर जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी तथा पदव्युत्तर विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. नरेंद्र खोडे, डॉ. प्रशांत मसारे, डॉ. रविन्द्र जाधव, डॉ. विवेक खंडाइत, आणि डॉ. प्रफुल पाटिल यांनी परिसंवादाच्या आयोजनात योगदान दिले. परिसंवादाच्या यशस्वी आयोजनात पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.