आजच्या तरुणांची दशा आणि दिशा चिंताजनक – राहुल गिरी

उदगीर (एल पी उगिले)
आजचा तरुण दिशाहीन झालेली आहे. या तरुणांना भरकटवले जात आहे. ही बाब निश्चितच त्याची दशा बदलणारी आहे. त्यामुळे आजच्या तरुणाची दशा आणि दिशा दोन्ही चिंताजनक आहेत. असे विचार प्रख्यात व्याख्याते राहुल गिरी यांनी व्यक्त केले. ते उदगीर येथील परशुराम जन्मोत्सव समितीमार्फत आयोजित केलेल्या “तरुणाची दशा आणि दिशा” या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी प्रमोद कुलकर्णी हे उपस्थित होते.
पुढे बोलताना धर्म अधिष्ठित तत्त्वज्ञान राहुल गिरी यांनी समजावून सांगितले. धर्मभेद न करता धर्म स्थापित करणारे परशुराम समजावून सांगणे आवश्यक असल्याचेही त्यांनी व्यक्त केले. तरुणांना दिशाहीन करण्यासाठी अर्धवट इतिहास सांगितला जात आहे. 21 वेळा क्षत्रियांना नामशेष करणाऱ्या परशुरामांनी स्वतःचे सामर्थ्य रामाला दिले, ही सत्य परिस्थिती आहे. क्षत्रिय आणि ब्राह्मण असा वाद लावून गैरसमज पसरवणाऱ्या लोकांनी तरुणाईला भरकटवले आहे. भगवान परशुराम हे क्षत्रियांचे शत्रू नव्हते, हाती परशु घेऊन धर्मभेद न करता धर्म स्थापित करणारे परशुराम समजावून सांगणे आवश्यक असल्याचे मत व्याख्याते राहुल गिरी यांनी व्यक्त केले. भगवान परशुराम जन्म महोत्सवा निमित्य लालबहादूर शास्त्री विद्यालय आजच्या तरुणाची दशा आणि दिशा या विषयावर ते बोलत होते .
पुढे बोलताना ते म्हणाले की, वडीलाबद्दलचा आदर म्हणजे काय? हे समजायचे असेल तर भगवान परशुराम आणि प्रभू रामचंद्र यांच्यासारखे दुसरे उदाहरण नाही. नव्या पिढीच्या मनात राष्ट्र निर्मितीचे स्वप्न पेरण्याचे महत्त्वाचे काम आजचे पालक विसरले आहेत. संकट आल्यानंतर ती कशी परतावावीत? याचे संस्कार केले तरच सुदृढ पिढी निर्माण होऊ शकेल. मोबाईल मुळे आजचे तरुण भावनाहीन होत आहेत. त्यामुळे मै तो झुकेगा नही म्हणणाऱ्या काल्पनिक पुष्पा पेक्षा प्रत्यक्षात कधीही न झुकणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास तरुणांना समजावणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या तरुणाईने पाश्चात्य संस्कृतीचा अंगीकार न करता भारतीय संस्कृती बद्दल आदर ठेवावा. वेस्ट कंट्रीज बेस्ट ही विचारधारा न स्वीकारता केवळ वेस्ट स्वीकारले आहे. ज्यावेळी संघर्षाचे, मेहनतीचे जंगल तुडवतात तेव्हा देवत्व मिळते. 100 बायका राण्या करणाऱ्या आणि एखादी चे थडगे बांधणाऱ्या राजाचे प्रेम आदर्श कहाणी म्हणून थोपविणारे विचार थांबवणे आणि एक पत्नी व्रत सांभाळणाऱ्या रामाचे प्रेम’ राधा कृष्णाचे प्रेम आजच्या पिढीला पालकांनी समजावून सांगण्याची गरज असल्याचेही राहुल गिरी यांनी सांगितले. आई-वडिलांच्या पाया न पडणारी तरुणाई राजकीय नेत्यांच्या पाया पडतात, ही वस्तुस्थिती स्वीकारून आई इतकी सुंदर स्त्री जगात दुसरी नाही आणि बापासारखा हिरो, नायक नाही. हे आजच्या पिढीला समजावणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आईबापावर प्रेम करणारेच इतिहास घडवू शकतात, हे ऐतिहासिक पुरुषाचे चरित्र शिकविले जाणे गरजेचे आहे. आईच्या डोळ्यातील स्वप्न आणि बापाच्या बनियान चे छिद्र पाहणारा तोच खरा पुत्र आहे. माणसाला माणूस बनविते ते शिक्षण होय, हे सावित्रीबाई फुले यांचे विचार रुजविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही संस्कृती विसरलो आहोत, यामुळे नात्यातील बिनविस्कटली आहे. चरितार्थ सोबत राष्ट्रप्रथम हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार रुजवणे आवश्यक आहे. आपल्या वाटाचे कार्य प्रामाणिकपणे करणे म्हणजेच देशसेवा आहे. मातीचे ओझे पेलण्याची ताकद तरुणाईत निर्माण होणे गरजेचे आहे. वेगळ्या विषयाची आग लावली जात आहे, ती विजवण्यासाठी स्वतःची जेवढी क्षमता असेल, तेवढे प्रयत्न करणे गरजेचे असून स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, मंगल पांडे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज त्यांचे चरित्र आणि रामायण, महाभारत आजच्या तरुणाईला पालकांनी समजावून सांगितले तर आदर्श नागरिक निर्माण होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीपक बलसुरकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्रीपाद पाटील यांनी केले. विष्णू कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमाची सांगता गोपाल जोशी यांच्या पसायदानाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दिलीप गायकवाड, अमोल निडवदे, सतीश पाटील, सावंत टाकसाळे, उद्धव महाराज हैबतपुरे यांच्यासोबतच भगवान परशुराम जन्मोत्सव समितीचे ऋषिकेश द्वेयपायन, नरेंद्र घनपाटी, व्यास द्वैयपायन, सावंत टाकसाळे, आदित्य कुलकर्णी, विष्णू कुलकर्णी, योगेश कुलकर्णी, अंबादास महाराज यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.