सिनेस्टाईल हाणामारी दोघे जखमी विनयभंग ही गुन्हा दाखल

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर तालुक्यातील नागलगाव लगत असलेल्या भीमा तांडा येथील अर्चना रामराव राठोड यांच्या घरासमोर चित्रपटात शोभेल अशा पद्धतीची हाणामारी झाली. या मारामारी मध्ये दोन जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तसेच हाणामारी करत असताना एका महिलेला वाईट हेतूने झोंबाझोंबी केल्याची ही तक्रार करण्यात आल्यामुळे उदगीर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाची अधिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथील अर्चना रामराव राठोड यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार नोंदवल्या वरून गु.र.क्र. 240 /25 कलम 74, 75, 189 (2), 191 (2), 193 (3), 190, 118 (1), 115 (2), 351 (2), 352 भारतीय न्याय संहिता सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये आरोपी शिवाजी चव्हाण व त्याचे भाऊ प्रदीप वामन चव्हाण, अनिल वामन चव्हाण, तानाजी वामन चव्हाण तसेच कमलाबाई वामन चव्हाण, वामन टीकाराम चव्हाण, रंगराव तुकाराम चव्हाण, अमोल रंगराव चव्हाण सर्व राहणार टिकाराम तांडा तालुका उदगीर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी सात वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घरासमोर आरोपींनी जिल्हाधिकारी यांचे जमावबंदीचा आदेश झुगारून देत, गैर कायद्याची मंडळी जमउन फिर्यादी ही घरासमोर झालोत करत असताना, फिर्यादीची ननंद ही रोडवर थांबली होती. त्यावेळेस आरोपी शिवाजी चव्हाण याने फिर्यादीच्या ननंदाच्या पाठीत लाथ मारून तिला खाली पाडले, व तिच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. मी तुमच्या घरात फाशी घेऊन मरतो, अशी धमकी दिली. तर आरोपी क्रमांक 2 याने फिर्यादीस काठीने मारले व तू मला लय आवडतेस, असे म्हणून हाताला वाईट हेतूने धरून ओढले व झोंबाझोंबी केली. तसेच आरोपी क्रमांक 3 याने केवळबाई राठोड यांना काठीने मारले तर आरोपी क्रमांक चार याने बाळू राठोड यांना काठीने मारले. दरम्यान आरोपी क्रमांक 1 ते 8 यांनी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करून हातातील काठीने मारहाण केली, व सर्वांनी मिळून “तुम्ही जर आमच्या नादाला लागलो तर तुम्हाला कोणालाच जिवंत सोडणार नाही”. असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. अशा आशयाची तक्रार फिर्यादी अर्चना रामराव राठोड यांनी उदगीर ग्रामीण पोलिसात दिली आहे. त्यावरून रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उदगीर ग्रामीणचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बाहत्तरे हे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
दरम्यान आरोपींना उपचारासाठी उदगीर येथील शासकीय रुग्णालयां मध्ये दाखल करण्यात आले आहे. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरच ही हाणामारी होत असताना तांड्यावरील सर्व लोक रस्त्यावर येऊन हा फुकटचा सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करत होते. पोलिसांना ही खबर समजताच उदगीर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी पोलीस बंदोबस्त पाठवून होऊ घातलेल्या दंगल सदृश्य परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. सध्या शांतता असल्याचे चित्र दिसून येत आहे.