कु. स्वरांजली मुंडे हिची आयआयटी इंदोर साठी निवड, महाविद्यालयाच्या वतीने सत्कार

उदगीर (एल पी उगिले)
येथील छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयातील कु. स्वरांजली मुंडे ही इंदोर येथील आयआयटी समर रिसर्च फेलोशिप साठी पात्र ठरली आहे. ती महाविद्यालयातील बीएस्सी प्रथम वर्षातील विद्यार्थिनी असून ती आयआयटी इंदोर येथे प्रोफेसर पंकज सहदेव यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्र विभागात नॅनो टेक्नॉलॉजी या विषयावर संशोधन करणार आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. एम. मांजरे यांच्या हस्ते तिचा सत्कार करून तिला पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी डॉ. मांजरे यांनी तिचे विशेष कौतुक केले. तिला या फेलोशिपसाठी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विजयकुमार जाधव यांनी केले. यावेळी माहिती देताना ते म्हणाले की, सदरील फेलोशिपसाठी हजारोच्या संख्येने विद्यार्थी अर्ज करत असतात. त्यामध्ये मेरिटनुसार विद्यार्थ्यांची निवड होते. यामध्ये स्वरांजलीची निवड झालेली आहे. ही आमच्या दृष्टीने महाविद्यालयासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या यशाबद्दल किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव पांडुरंगराव शिंदे, सर्व कार्यकारिणी सदस्य,सिनेट सदस्य डॉ.विष्णू पवार, बी. के. पाटील, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.