उदगीरची रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार समिती महाराष्ट्रात चौथ्या क्रमांकावर

उदगीर (एल पी उगिले)
राज्यातील कृषी उत्पन्न बाजार
समित्यांच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील कामगिरीच्या आधारे क्रमवारी (रॅकिंग) जाहीर झाली आहे. त्यानुसार ३०५ बाजार समित्यांपैकी हिंगणघाट (वर्धा) बाजार समिती पहिल्या क्रमांकावर असून, कारंजा लाड (वाशिम) दुसऱ्या ,बारामती (पुणे) बाजार समिती तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती पणन संचालक विकास रसाळ यांनी दिली. क्रमवारीच्या माहितीचा उपयोग पणन व्यवस्थेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी होऊ शकणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
तसेच, ६८ खासगी बाजारांपैकी यवतमाळ जिल्ह्यातील कॉटनसिटी अॅग्रो फुड्स प्रा. लि. भोयर हा खासगी बाजार पहिल्या क्रमांकावर आहे याच जिल्ह्यातील किसान मार्केट यार्ड, शेलू बुद्रुक (ता. पुसद) हा खासगी बाजार दुसऱ्या क्रमांकावर, व नाशिक जिल्ह्यातील परफेक्ट कृषी मार्केट यार्ड प्रा. लि., नांदूर हा खासगी बाजार तिसऱ्या तर. लातूर जिल्ह्यातील रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार उदगीर चौथ्या क्रमांकावर असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत राज्यभरातील ३०५ बाजार समित्यांची व ६८ खासगी बाजारांची क्रमवारी मागील दोन वर्षांपासून जाहीर करण्यात येत आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने स्मार्ट प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांपैकी राज्यातील बाजार समित्यांचीआणि खासगी बाजारांची त्यांच्या कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी प्रसिद्ध करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
जागतिक बँकेच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या विक्री व्यवस्थेमध्ये बाजार समितीत असलेल्या पायाभूत व इतर सुविधा, आर्थिक व वैधानिक कामकाज, योजना उपक्रम राबविण्यातील सहभाग यानुसार वार्षिक क्रमवारीसाठी ३५ निकष आणि २०० गुण निश्चित केले आहेत. खासगी बाजारांसाठी ४० निकषांसाठी २५० गुण निश्चित केले आहेत. या निकषांशी संबंधित माहिती तालुका व जिल्हास्तरीय समित्यांनी तपासणी करून गुण दिले आहेत. या गुणांच्या आधारावर राज्यातील बाजार समित्यांची तसेच खासगी बाजारांची सन २०२३-२४ या वर्षांची क्रमवारी निश्चित केली आहे.
बाजार समित्यांची आणि खासगी बाजारांची वार्षिक क्रमवारी जाहीर झाल्यामुळे आपण शेतमाल विक्री साठी नेत असलेल्या बाजार समित्यांचे किंवा खासगी बाजारांचे स्थान हे इतर बाजार समित्यांच्या किंवा खासगी बाजारांच्या तुलनेत कोठे आहे. हे शेतकऱ्यांना समजणार आहे.
तसेच यामुळे शेतकर्यांना आकर्षित
करण्यासाठी अधिकाधिक सुविधा देण्याची निकोप स्पर्धा बाजार समित्यांमध्ये तसेच खासगी बाजारांमध्ये निर्माण होण्यास चालना मिळणार आहे बाजार समितीचा विकास करताना नेमक्या कोणत्या बाबींना प्राधान्य द्यायचे आहे, बाजार घटकांचे कोणते प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत, याची स्पष्टता क्रमवारीनुसार बाजार समित्यांच्या संचालक मंडळास येणार आहे.
तरी खाजगी बाजार समितीमध्ये रंगराव पाटील कृषी उत्पन्न खाजगी बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी आपल्या बाजारामध्ये उत्कृष्ट दर्जाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून हा मान पटकाविला आहे. यामुळे बाजार समितीचे सभापती भास्कर रंगराव पाटील व त्यांच्या सहकार्याचे सर्वत्र कौतुक व प्रशंसा होत आहे.