राज्यस्तरीय वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी पुणे येथे ४ दिवसीय शिबिर

उदगीर (एल.पी. उगिले) : शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी), पुणे येथे २६ ते २९ एप्रिल २०२५ या कालावधीत चार दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. लातूर विभागातील ८ सुलभकांनी या प्रशिक्षणात सहभाग नोंदविला आहे.
१२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना “वरिष्ठ श्रेणी” व २४ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्यांना “निवड श्रेणी” पदावर पदोन्नती दिली जाते. अशा शिक्षकांना यंदा मे महिन्यात दहा दिवसांचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार असून, यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि अध्यापक महाविद्यालयातील शिक्षकांचा समावेश आहे.
प्रशिक्षणाचे उद्घाटन एससीईआरटीचे संचालक राहुल रेखावार (भा. प्र. से.) यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी सेवापूर्व विभागाच्या उपसंचालिका डॉ. माधुरी सावरकर, उपसंचालक इब्राहिम नदाफ, सहाय्यक शिक्षण संचालक डॉ. दीपक माळी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी संचालक राहुल रेखावार यांनी सांगितले की, “शाळा व्यवस्थापन, नेतृत्व कौशल्ये, नव्या अध्यापन तंत्रांचा वापर, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि शैक्षणिक धोरणातील बदल आदी बाबतीत शिक्षकांना प्रशिक्षित केले जात आहे.”
डॉ. सावरकर यांनी नमूद केले की,”“वरिष्ठ भूमिकेसाठी शिक्षकांना सक्षम करणे व शिक्षण व्यवस्थेत त्यांच्या योगदानाची गुणवत्ता वाढवणे, हे प्रशिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.”
डॉ. माळी यांनी सांगितले की, “हे प्रशिक्षण शिक्षकांच्या पुढील टप्प्याच्या जबाबदाऱ्यांसाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.”
कोविड-१९ काळात ऑनलाईन पद्धतीने झालेल्या प्रशिक्षणानंतर, प्रत्यक्ष उपस्थितीतील प्रशिक्षण यंदापासून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. विशेषतः कला आणि क्रीडा या विषयांना यंदाच्या प्रशिक्षणात महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे, आणि त्या अनुषंगाने या शिक्षकांसाठी दहा दिवसांमधील तीन दिवस स्वतंत्र प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे.
लातूर विभागाच्या सहभागाबाबत सांगायचे तर, लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड (डायट)च्या प्राचार्या डॉ. भागीरथी गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ अधिव्याख्याता डॉ. मारुती सलगर, वरिष्ठ अधिव्याख्याता जयपाल कांबळे, अधिव्याख्याता डॉ. राजेश गोरे, अधिव्याख्याता योगेश्वरी नाडे, तसेच दयानंद कला महाविद्यालय लातूरचे प्रा. डॉ. संदीपान जगदाळे, यशवंत विद्यालय अहमदपूरचे कला शिक्षक महादेव खळुरे, जय भारत विद्यालय दापका (ता. निलंगा) येथील क्रीडाशिक्षक सुनील तारे आणि श्री षण्मुखेश्वर विद्यालय तांबाळा (ता. निलंगा) येथील क्रीडाशिक्षक अंकुश मंडले या आठ सुलभकांनी सहभाग घेतला आहे.
प्रशिक्षणाच्या उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन अधिव्याख्याता अभय परिहार यांनी केले. तर, प्रशिक्षणाच्या यशस्वी आयोजनासाठी उमेश प्रधान, डॉ. अजयकुमार लोळगे, डॉ लक्ष्मण चलमले आणि अभिनव भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.