विजय घोगरे यांना श्रद्धांजली: अहमदपुरात रास्ता रोको करत ‘शहीद’ दर्जाची मागणी
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) मराठा आरक्षणासाठी मुंबई येथे आंदोलन करत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेले मराठा सेवक विजय चंद्रकांत घोगरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यापूर्वी अहमदपूर शहरात सकल मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. घोगरे यांना ‘शहीद’ दर्जा देण्याची, कुटुंबाला सरकारी नोकरी आणि आर्थिक मदत देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी टाकळगाव येथील विजय घोगरे हे मुंबईतील आझाद मैदानावर गेले होते. शनिवारी, ३० ऑगस्ट रोजी त्यांना आंदोलनस्थळीच हृदयविकाराचा झटका आला. आंदोलनस्थळी उपचाराच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांचे निधन झाल्याची खंत व्यक्त करत सकल मराठा समाजाने रविवारी, ३१ ऑगस्ट रोजी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शोकसभा घेतली. यानंतर, घोगरे यांचे पार्थिव घेऊन आलेल्या रुग्णवाहिकेसोबतच मराठा बांधवांनी तब्बल अडीच तास रास्ता रोको आंदोलन करत शासनाचा तीव्र निषेध केला.
शासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
यावेळी मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी तहसीलदार उज्वला पांगरकर यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, आंदोलनस्थळी कोणत्याही सोयीसुविधा आणि उपचाराची व्यवस्था नव्हती. यामुळे विजय घोगरे यांचा तणाव वाढून हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूला महाराष्ट्र शासन कारणीभूत असून, शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच, विजय घोगरे यांना ‘शहीद’ घोषित करून त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेत सामावून घेण्याची आणि कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणीही करण्यात आली. आंदोलकांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की, त्यांच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय पार्थिव जागेवरून हटवणार नाही आणि अंत्यसंस्कारही करणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली.
तहसीलदारांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
आंदोलकांची संतप्त भावना पाहून तहसीलदार उज्वला पांगरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मराठा बांधवांचे निवेदन स्वीकारले आणि शासनाकडे घोगरे यांच्या कुटुंबीयांना सरकारी नोकरीत सामावून घेण्याचा प्रस्ताव पाठवण्याचे तसेच भरीव आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर मराठा बांधवांनी आपले आंदोलन स्थगित केले आणि विजय घोगरे यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कारासाठी रवाना करण्यात आले.
