“तू म्हणालास ना, लवकर येशील, मग का नाही आलास रे विजू…” आईचा आक्रोश ! उपस्थितांचे डोळे पाणावले
विजयकुमार घोगरे यांच्या पार्थिवावर टाकळगाव येथे अंत्यसंस्कार
अहमदपूर, ( गोविंद काळे ): मराठा आरक्षणासाठी मुंबईत सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी गेलेल्या अहमदपूर तालुक्यातील टाकळगावचे सुपुत्र विजयकुमार घोगरे (वय ३०) यांचे शनिवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी दुपारी त्यांचे पार्थिव टाकळगाव येथे आणण्यात आले. यावेळी गावातील हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत त्यांच्यावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
तीन दिवसांपूर्वी घरातून निघताना ‘मी लवकरच परत येईन’ असे आश्वासन देऊन गेलेल्या विजयकुमार यांचे पार्थिव गावात येताच त्यांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. रुग्णवाहिका पाहून आई मीराबाई, पत्नी अंजली आणि मुलगे माऊली व अविराज यांनी हंबरडा फोडला. “तू म्हणालास ना, लवकर येशील, मग का नाही आलास रे विजू…” असे म्हणत आईच्या आक्रोशाने उपस्थितांचेही डोळे पाणावले.
विजयकुमार हे २७ ऑगस्ट रोजी गावातील ४५ तरुणांसोवेत दोन टेम्पो भरून मुंबईच्या आझाद मैदानात आंदोलनासाठी गेले होते. हातात झेंडा आणि डोळ्यात निर्धाराची ज्योत घेऊन ते आंदोलनात सहभागी झाले होते. अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. ही बातमी गावात समजताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली.
विजयकुमार यांच्या वडिलांना दोन एकर कोरडवाहू शेती असून, त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. १२ वी पर्यंत शिक्षण घेतलेले विजयकुमार शेती आणि छोटी-मोठी कामे करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. त्यांना समाजकारणाची खूप ओढ होती आणि ते नेहमी समाजासाठी पुढे असायचे.
समाजासाठी दिलेल्या या बलिदानाबद्दल ग्रामस्थांनी ‘विजयकुमार अमर रहे’ च्या घोषणा दिल्या. यावेळी समाजबांधवांनी “एक योद्धा गेला, पण आमचा लढा कायम राहणार. त्यांचे हे बलिदान वाया जाऊ नये, आरक्षण मिळवून देणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे” असा निर्धार केला. अहमदपूर आणि लातूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
