अहमदपूरमध्ये ‘डीजेमुक्त’ गणेश विसर्जन मिरवणुका; शांततेत पार पडले विसर्जन
अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४१ गावांमध्ये एकूण ९४ गणेश मूर्तींचे विसर्जन अत्यंत शांततेत आणि कोणत्याही डीजेच्या गजराशिवाय पार पडले. पोलीस आणि स्थानिक गणेश मंडळांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे हे यश मिळाले असून, त्यामुळे ध्वनी प्रदूषण आणि सार्वजनिक शांततेला कोणताही धोका निर्माण झाला नाही.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अप्पर उपअधीक्षक मंगेश चव्हाण आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनुर यांनी गणेश मंडळांना गणेश मूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने आणि पारंपरिक धार्मिक व सांस्कृतिक वाद्यांचा वापर करून करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी सहकार्य केले.
यामुळे सर्व विसर्जन मिरवणुका शांतता आणि सुव्यवस्थेचे वातावरण कायम ठेवून पार पडल्या. अहमदपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणत्याही गावात डीजेचा वापर करण्यात आला नाही, ज्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
या यशस्वी आणि शांततापूर्ण विसर्जनासाठी पोलिसांनी सर्व गणेश मंडळांचे आणि गावकऱ्यांचे आभार मानले. नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दिलेल्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वी झाला, असेही त्यांनी नमूद केले. या उपक्रमाने अहमदपूर तालुक्यात सामाजिक सलोख्याचे एक उत्तम उदाहरण निर्माण झाले आहे.
