अहमदपूरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप; डीजेवरील बंदीमुळे स्वागत सोहळ्यावर बहिष्कार

0
अहमदपूरमध्ये ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला निरोप; डीजेवरील बंदीमुळे स्वागत सोहळ्यावर बहिष्कार

​अहमदपूर ( गोविंद काळे ) ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात, गुलाल आणि फुलांच्या वर्षावात अहमदपूर शहरात गणपती बाप्पाचा विसर्जन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा प्रशासनाने ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजेवर पूर्णपणे बंदी घातली होती, त्यामुळे मिरवणुका केवळ पारंपरिक ढोल-ताशे, हलगी आणि संबळच्या तालावर निघाल्या. या पारंपरिक वाद्यांनी आणि पारंपरिक पोशाख घातलेल्या मंडळांच्या मिरवणुकीने सोहळ्याला एक वेगळीच शोभा आली.
​दुपारी २.३० वाजता मानाच्या ‘आजोबा गणपती’ची आरती आचार्य गुरुराज स्वामी यांनी केली. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर, मुख्याधिकारी संतोष लोमटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आझाद चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि शिवाजी महाराज चौक परिसरात विसर्जन पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती.
​पोलीस बंदोबस्त आणि पोलिसांसाठी जेवणाची सोय
विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायभोळे आणि पोलीस निरीक्षक बी.डी. भुसनूर यांच्या मार्गदर्शनाखाली ४ उपनिरीक्षक, ४५ पोलीस, ६५ होमगार्ड आणि एसआरपी तुकडी तैनात होती. बाहेरगावाहून आलेल्या पोलिसांसाठी डॉ. वैभव रेड्डी आणि इनर व्हील क्लबने जेवण व पाण्याची व्यवस्था केली. डॉ. रेड्डी यांनी पोलिसांच्या सेवेला सलाम केला आणि त्यांच्या मेहनतीमुळेच हा उत्सव शांततेत पार पडल्याचे सांगितले.
​डीजेवरील बंदीमुळे स्वागत सोहळ्याला बहिष्कार
दरवर्षीप्रमाणे नगरपालिकेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात गणेश मंडळांच्या स्वागतासाठी व्यासपीठ उभारण्यात आले होते. परंतु, डीजेवरील बंदीमुळे नाराज झालेल्या गणेश मंडळांनी प्रशासनाचा सत्कार स्वीकारण्यास नकार दिला. अहमदपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच गणेश मंडळांनी स्वागत सोहळ्यावर बहिष्कार टाकला. मात्र, डीजे नसला तरी ढोल-ताशांच्या गजरात आणि पारंपरिक नृत्याने संपूर्ण शहर दुमदुमले होते. स्वराज्य मंडळाच्या मिरवणुकीने विशेष लक्ष वेधून घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!