निलंग्यात मनसेचे रास्ता रोको आंदोलन, अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी एकरी पन्नास हजारांची मदत मागितली
निलंगा (गोविंद काळे): लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेतजमिनी पुराच्या पाण्यामुळे खरडून गेल्या असून शेतकरी संकटात सापडला आहे. या गंभीर परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) निलंगा-कासारसिरसी मार्गावरील दादगी मोड येथे भव्य रास्ता रोको आंदोलन केले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने यांनी शासनाकडे तातडीने एकरी पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याची जोरदार मागणी केली. “अतिवृष्टीने शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्याला तात्काळ मदत देणे सरकारचे कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले.
या आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन बिराजदार, माजी तालुकाध्यक्ष सुरज पटेल, प्रदीप शेळके, तालुका सचिव गणेश उसनाळे, तालुका उपाध्यक्ष विकास सूर्यवंशी, बालाजी पवार, सदाशिव हाडोळे, शिवराज चिंचोळे, सोमलिंग पाटील, कृष्णा सुरवसे, शुभम माने, बालाजी खिचडे, नरसिंग महालिंग, महेश सावनगिरे, राहुल पाटील, मल्लिकार्जुन कुरळे, जीवन बोरुळे यांच्यासह निलंगा तालुक्यातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. मनसे कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.
