गणेशोत्सवात महावितरणची तत्परता; अवघ्या दोन तासांत बसवला नवीन ट्रान्सफॉर्मर
अहमदपूर ( गोविंद काळे ) गणेशोत्सव सुरू असताना शहरातील आझाद चौक परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांची गैरसोय झाली. मात्र, महावितरण कार्यालयाच्या तत्परतेमुळे अवघ्या दोन तासांत जुना, नादुरुस्त ट्रान्सफॉर्मर बदलून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. महावितरणच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गणेशोत्सवाच्या उत्साहात दुपारी अचानक आझाद चौकातील ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाला. यामुळे परिसरातील अनेक घरांचा वीजपुरवठा खंडित झाला. ही माहिती मिळताच महावितरणच्या अहमदपूर कार्यालयाचे उप-कार्यकारी अभियंता डी. बी. पाटील, सहायक अभियंता पंडित राठोड आणि सहायक अभियंता कासनाळे सुनील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह कोणताही विलंब न करता युद्धपातळीवर काम सुरू केले. जुना ट्रान्सफॉर्मर काढून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम अवघ्या दोन तासांत पूर्ण झाले. यामुळे परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
गणेशोत्सवादरम्यान महावितरणने दाखवलेल्या या तत्परतेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय टळली असून, सण साजरा करण्याचा आनंद कायम राहिला. अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सोबत स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून काम पूर्ण करून घेतल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक होत आहे.
