विकासाच्या मुद्द्यावर ‘तगडी फाइट’ देणार; महापुरुषांना अभिवादन करून प्रचाराची रणधुमाळी सुरू
पोलीस फ्लॅश न्यूज अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर नगर परिषद निवडणूक २०२५ च्या रणसंग्रामात महाविकास आघाडीने (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट व शिवसेना उबाठा) प्रचाराचे रणशिंग फुंकले. सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८.३० वाजता शहराच्या आराध्य दैवतांचे आणि महापुरुषांचे दर्शन घेऊन रॅलीद्वारे प्रचाराचा धडाक्यात शुभारंभ करण्यात आला. या वेळी माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्या उपस्थितीत आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी विजयाचा निर्धार व्यक्त केला.
प्रचाराची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे झाली. येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बसवेश्वर चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि सावरकर चौक येथे जाऊन महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सर्वसमावेशक विचारसरणीचा संदेश दिला.
त्यानंतर ही भव्य प्रचार रॅली शहराच्या विविध भागांतून मार्गस्थ झाली. यामध्ये प्रामुख्याने साठे नगर, क्रांती चौक, कुमठा कॉलनी (इच्छापूर्ती हनुमान मंदिर परिसर), भारत कॉलनी आणि मरशीवणी या दाट लोकवस्तीच्या भागांचा समावेश होता. तसेच शहरातील प्रमुख धार्मिक स्थळे असलेल्या महादेव मंदिर, गणपती मंदिर, चुडामणी महाराज मंदिर, पंचमुखी हनुमान मंदिर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात जाऊन उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला. संपूर्ण शहर पिंजून काढत महाविकास आघाडीने प्रचारात मोठी आघाडी घेतली.
विकासाची ‘ब्ल्यू प्रिंट’ आणि नेत्यांचा आत्मविश्वास
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे लातूर जिल्हाध्यक्ष विनायकराव पाटील यांनी विरोधकांना ‘तगडी फाइट’ देण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, “अहमदपूर शहराचा सर्वांगीण विकास, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य हे आमचे प्रमुख मुद्दे आहेत. महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार एकदिलाने आणि संयोजित शक्तीने जनतेचा विश्वास जिंकण्यासाठी सज्ज आहेत. शहराच्या विकासाचा केंद्रबिंदू डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही निवडणूक लढवत आहोत.”
या प्रचार शुभारंभ प्रसंगी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख कलिमोद्दीन अहमद, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, सोमेश्वर कदम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत मद्दे, सांब महाजन, माधव जाधव यांच्यासह आघाडीचे सर्व घटक पक्ष आणि उमेदवार उपस्थित होते. नगरसेवक पदाचे उमेदवार भारत सांगविकर, परमेश्वर घोगरे, गोपीनाथ जोंधळे, राम बेल्लाळे, गणेश कदम यांनीही रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. कार्यकर्त्यांच्या प्रचंड उत्साहामुळे आणि नागरिकांच्या प्रतिसादामुळे महाविकास आघाडीने प्रचाराच्या पहिल्याच दिवशी वातावरण निर्मिती केल्याचे दिसून आले.
