लातूरातील शांतता भंग करणाऱ्या पाच गुन्हेगाराच्या टोळीवर कारवाई. दोन वर्षांसाठी हद्दपार.

0
लातूरातील शांतता भंग करणाऱ्या पाच गुन्हेगाराच्या टोळीवर कारवाई. दोन वर्षांसाठी हद्दपार.
             लातूर (एल पी उगिले) शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे, या उद्देशाने लातूर पोलीस प्रशासनाने महत्त्वपूर्ण आणि कठोर निर्णय घेत  शिवाजी नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सक्रिय असलेल्या पाच सराईत गुन्हेगारांच्या टोळीवर सविस्तर चौकशी, पुरावे आणि कायदेशीर बाबींचा विचार करून महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम ५५ (तडीपार) अंतर्गत कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षक, लातूर अमोल तांबे यांनी सदर टोळीला दोन वर्षांसाठी लातूर, बीड, धाराशिव, परभणी व नांदेड या पाच जिल्ह्यांच्या सीमा क्षेत्रातून निष्कासित करणारा अंतिम आदेश निर्गमित केला आहे.
हद्दपार करण्यात आलेले आरोपी मध्ये अतुल रुकमाजी कसबे (रा. कॉईल नगर, लातूर),दया सतीश डोंबे (रा. विवेकानंद हॉस्पिटलसमोर, सिग्नल कॅम्प, लातूर),सोन्या ऊर्फ तुषार राजकुमार कांबळे (रा. कॉईल नगर, लातूर),गणेश नामदेव भालेकर (रा. कॉईल नगर, लातूर),ओमकार उर्फ लाट्या सुनील शिंदे(रा. गांधी नगर, लातूर) यांचा समावेश असून वरील आरोपी हे एकमेकांशी संपर्क ठेवून गुन्हेगारी स्वरूपाची टोळी तयार करीत असल्याचे चौकशीत सिद्ध झाले.
चौकशीमध्ये आढळले की, ही टोळी गटाने हिंसाचार व मारामाऱ्या करणे, शस्त्रे घेऊन फिरणे व दहशत निर्माण करणे, लूट, चोरी, घरफोडीचे गुन्हे, महिलांना उद्देशून अश्लील वर्तन, छेडछाड, धमक्या देऊन परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणे, पिडीत व साक्षीदारांना न्यायालयात फितूर करण्यासाठी दबाव टाकणे. असे विघातक कृत्य करत होते. यामुळे परिसरातील नागरिक सतत भीतीच्या छायेत राहत होते, तक्रार देण्यास आणि साक्ष देण्यास कोणीही पुढे येत नव्हते.
नमूदटोळी विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात धारदार शस्त्र वापरून गंभीर दुखापत, मारहाण, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 118(1)(2) दंगलप्रवृत्ती, सार्वजनिक शांततेचा भंग, जबरी चोरी, घरात घुसून मारामारी, महिला छेडछाड, घरफोडी, लूट, जखमी करणे या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वरील आरोपींचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे चौकशीदरम्यान सापडले. सराईत आरोपींच्यावर याआधी वेळोवेळी कलम १०७/११० सीआरपीसी,कलम १४९ नोटिसा,शांतताभंग कारवाईचे प्रस्ताव प्रमाणे प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. तरीही आरोपी सुधारण्याची कोणतीही लक्षणे दिसली नाहीत.उलट सदरच्या टोळी कडून उघडपणे दहशत निर्माण केली जात होती.परिसरातील लहान व्यावसायिक, दुकानदार, महिलावर्ग, विद्यार्थिनी हे सर्वजण भीतीमुळे बाहेर पडण्यास संकोच करीत होते.अनेक प्रकरणांत पिडीत व साक्षीदार हे न्यायालयात फिर्याद सिद्ध करण्यास तयार नव्हते. न्यायालयीन कामकाजावर व पोलीस तपासावर दडपण आणण्याचा प्रयत्न सातत्याने होत होता. या सर्व बाबींवरून कायदा-सुव्यवस्थेला ठोस धोका निर्माण झाला असल्याचे स्पष्ट झाले.
उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर यांनी सविस्तर तपास करून टोळीविरुद्ध हद्दपारी कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट अहवाल सादर केला.आरोपींना नोटीस दिल्यानंतरही त्यांनी समाधानकारक उत्तर सादर केले नाही. पुरावे, साक्ष, पंचनामे, नागरिकांची मते, आधीचे गुन्हे, गुन्ह्यांची गंभीरता आणि भविष्यातील धोका यांचा सखोल अभ्यास करून पोलीस अधीक्षकांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत तडीपार आदेश जारी केला आहे. नमूद आरोपींना लातूर जिल्ह्याच्या सीमाबाहेर सोडण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाचे आवाहन :-
लातूर पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. गुन्हेगारी वृत्तीचा एकही व्यक्ती कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देऊ शकणार नाही, यासाठी पुढेही कठोर कारवाई सुरूच राहील.नागरिकांनी कोणतीही गुन्हेगारी हालचाल, संशयास्पद व्यक्ती किंवा टोळीगत हालचाली दिसल्यास तत्काळ पोलीस कंट्रोल रूमला, किंवा डायल 112 वर कळवावे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!