धवल क्रांती पुरस्काराने लातूर जिल्ह्यातील १२ आदर्श दुध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान, डॉ. अनिल भिकाने यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष गौरव सोहळा
उदगीर (एल पी उगीले) तालुक्यातील मौजे करडखेल येथे
महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे माजी विस्तार शिक्षण संचालक तथा पशुपालक शेतकऱ्यांचे मार्गदर्शक डॉ. अनिल भिकाने यांच्या वाढदिवसानिमित्त लातूर जिल्ह्यातील १२ आदर्श दुध उत्पादक शेतकऱ्यांचा “धवल क्रांती पुरस्कार” देऊन गौरव करण्यात आला. हा महत्वाकांक्षी व प्रेरणादायी सोहळा करडखेल येथे उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उदगीर तालुक्याचे माजी आमदार व ज्येष्ठ शेतकरी नेते शिवराज तोंडचिरकर हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून लातूर कृषी महाविद्यालयाचे अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. बाबासाहेब ठोंबरे, लातूर जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापक रामराव बिरादार, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विश्वनाथ मुडपे गुरुजी व करडखेलचे उपसरपंच गिरीश राघू यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
पशुपालक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून संपूर्ण आयुष्य शेतकरी व पशुपालकांसाठी निस्पृह भावनेने समर्पित करणारे, संशोधन, शिक्षण व विस्तार कार्याच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणारे ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. अनिल भिकाने यांचा यावेळी मान्यवरांनी गौरव केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकरी आधुनिक पशुपालन व दुग्ध व्यवसायाकडे वळले असून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवे बळ मिळाले आहे, असे मत मान्यवरानी व्यक्त केले.
कार्यक्रमात दुध उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे लातूर जिल्ह्यातील सतपाल रेड्डी (उजेड), विष्णू कोळगीर (चोंडी), नविद अलिखान (अहमदपूर ) राजपाल बिराजदार (नेकनाळ), संतोष पाटील (तोंडार), राहुल रक्षाळे (लोहारा) ,प्रविण घुगे (कुमठा ) गणेश मातनकर (करडखेल) , वैभव वाडकर ( डिगोळ), परमेश्वर नरहारे ( तिवटग्याळ), गणेश गुरमे (हेर ), राम गंगापुरे (कबनसांगवी) आदी १२ आदर्श दुध उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह, शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन लक्ष्मी दूध उत्पादक सहकारी संस्था, करडखेल यांच्या वतीने करण्यात आले होते. ज्ञानेश्वर कंजे यांनी या उपक्रमाचे प्रमुख संयोजक म्हणून पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वनाथ मुडपे, सुत्रसंचालन कुणाल घुंगार्डे , प्रक्षेत्र व्यवस्थापक एम एसडी ॲनिमल हेल्थ यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर कंजे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ओकांर मेडिकलचे महादेव सुर्यवंशी यानी परिश्रम घेतले.
यावेळी जिव्हाळा ग्रुपचे विश्वनाथराव बिरादार, अमृतराव देशपांडे, माजी सरपंच दिलीप निडवंचे, कृष्णाथ जाधव, राहूल उगीले, ज्ञानोबा गुरमे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी, दुग्ध उत्पादक, पशुपालक, सहकारी संस्था पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
