शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून बाजार समितीमार्फत हमीभाव केंद्र सुरू – सभापती शिवाजी हुडे

0
शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून बाजार समितीमार्फत हमीभाव केंद्र सुरू - सभापती शिवाजी हुडे

उदगीर (एल पी उगिले)
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून, सोयाबीन हमीभाव केंद्र बाजार समितीमार्फत सुरू करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती ही संस्था शेतकऱ्यांच्या, व्यापाऱ्यांच्या, हमाल, मापाडी यांच्या हिताचा विचार करून कार्य करते. आज पर्यंत बाजार समितीच्या वतीने सदैव लोककल्याणकारी योजना राबवल्या आहेत. भविष्यातही तोच विचार आहे. असे विचार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव हुडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून नाफेड आणि महाराष्ट्र राज्याच्या पणन महासंघाच्या वतीने सुरू करण्यात येत असलेल्या सोयाबीन हमीभाव नोंदणी केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती प्रीती चंद्रशेखर भोसले, उदगीर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक संतोष बिरादार, बाजार समितीचे संचालक विधीज्ञ पद्माकर उगीले, प्रमोद पाटील, बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रदीप पाटील यांच्यासह नोंदणीसाठी उपस्थित असलेले अनेक शेतकरी याप्रसंगी उपस्थित होते.

पुढे बोलताना सभापती शिवाजीराव हूडे म्हणाले की, उदगीर बाजारात सध्या 4600 च्या जवळपास सोयाबीनचा भाव चालू आहे. वास्तविक पाहता शासनाने हमीभाव जास्त सांगितला असला तरी गरजू शेतकरी तातडीची गरज म्हणून मिळेल त्या भावामध्ये आपल्याकडील सोयाबीन बाजारात विकत आहेत. त्या ऐवजी त्यांनी शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर सोयाबीन ची नोंद करावी. जेणेकरून त्यांना बाजार समितीच्या हमीभाव खरेदी केंद्रावर 5328 रुपये इतका भाव मिळू शकेल.
लातूर जिल्ह्यात उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही शेतकऱ्यांनी कुठेही जरी हमीभाव खरेदी केंद्रावर नोंदणी केली असेल तरीही, आपले सोयाबीन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोडाऊन मध्ये घेऊन आल्यास त्यांचे स्वागत करण्यात येईल. आपण नोंदणी दुसऱ्याच एखाद्या केंद्राच्या ठिकाणी केली आहे, आता सोयाबीन तिथेच घेऊन जावे लागेल, अशी कोणतीही अडचण येणार नाही. अशी शाश्वती ही याप्रसंगी शिवाजीराव हुडे आणि विधीज्ञ पद्माकर उगिले यांनी दिली आहे.
कोणत्याही खरेदी विक्री केंद्रावर जरी नोंदणी केली असेल किंवा मोबाईलवर ऑनलाइन जरी नोंदणी केली असेल किंवा शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कोणत्या एखाद्या सेंटरचे नाव जरी आले असेल तरी देखील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सोमनाथपूर येथील गोडाऊन वर सोयाबीन घेऊन आल्यास माल खरेदी केला जाईल. शेतकऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही. याची शाश्वती घेतली जाईल, शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्याचा उद्देश कृषी उत्पन्न बाजार समितीचा असून त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याने शेतकऱ्यांना यापूर्वी कोणत्या केंद्रावर काही त्रास झाला असेल तर भविष्यात तो होणार नाही. याची दक्षता घेतली जाईल. काही ठिकाणी शेतकऱ्यांची लूट झाल्याची ओरड गेल्या वर्षी झाली होती, तशी कोणतीही लूट होऊ दिली जाणार नाही. अशी खात्रीही याप्रसंगी उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांनी दिली आहे.
उदगीर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून सोयाबीन विक्री केल्यास शेतकऱ्यांना चांगली सेवा देता येईल. असा विश्वास शिवाजीराव हुडे यांनी याप्रसंगी दिला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत कोयले यांनी तर आभार प्रदर्शन बाजार समितीचे प्रभारी सचिव प्रदीप पाटील यांनी केले. याप्रसंगी शासकीय हमीभाव खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!