लीळाचरित्र समग्र मराठी भाषकांच्या मालकीचे. — इंद्रजीत भालेराव.

0
लीळाचरित्र समग्र मराठी भाषकांच्या मालकीचे. -- इंद्रजीत भालेराव.

उदगीर (एल पी उगिले) जुन्या सर्वच वाङ्मयपाठीमागची निर्मितीप्रेरणा धर्म असली तरी त्यातल्या वाङ्मयीन गुणामुळे आणि ऐतिहासिक व सामाजिक दस्तऐवजामुळे लीळाचरित्र हा ग्रंथ केवळ महानुभाव पंथाचा धर्मग्रंथ नसून त्यावर समग्र मराठी भाषकांची मालकी आहे, असे प्रतिपादन इंद्रजीत भालेराव यांनी केले.
उदगीर येथील ‘चला कवितेच्या बनात या उपक्रमांतर्गत चालू असलेल्या ३५१ व्या वाचक संवाद मध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक, ग्रामीण कवी तथा अभ्यासू वक्ते इंद्रजीत भालेराव यांनी आचार्य पंडित म्हाइंभट्ट लिखित लीळाचरित्र या ग्रंथावर संवाद साधला, यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, लीळाचरित्र लिहिले त्याला आणखी चार वर्षांनी साडेसातशे वर्षे होतील. लीळाचरित्र हा मराठीतला आद्यग्रंथ आहे. तो प्रादेशिक भाषांमधलाही आद्यग्रंथ आहे. कारण लीळाचरित्र लिहून झाले, तोपर्यंत भारतातल्या कुठल्याच प्रादेशिक भाषेत कोणताच ग्रंथ निर्माण झालेला नव्हता. चरित्रलेखन या वाङ्मय प्रकारात तो जगातला पहिला ग्रंथ आहे, असे सदानंद मोरे यांनी सांगितल्याचे इंद्रजीत भालेराव म्हणाले.
लीळाचरित्रात आठशे वर्षांपूर्वीची मराठी भाषा, समाज, संस्कृती यांचे समग्र दर्शन घडते. तत्कालीन कर्मठ वातावरणात अनेक क्रांतिकारक गोष्टीही चक्रधरांनी केल्या असे त्यांनी सांगितले. स्त्रियांना दिलेली समानतेची वागणूक, अस्पृश्यांना लावलेला लळा, मराठी भाषेचा धरलेला आग्रह या गोष्टींवर चक्रधरांनी भर दिला. त्यातूनच आजच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीचा पाया घातला गेला, असेही भालेराव यांनी सांगितले.
या संवादानंतर झालेल्या चर्चेत अनेकांनी सहभाग नोंदवला. शेवटी अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे यांनी संवादकाचे कौतुक केले. छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हणमंत म्हेत्रे यांनी केले, प्रास्ताविक प्रा.राजपाल पाटील तर संवादकांचा परिचय प्रा.डॉ. बालाजी सूर्यवंशी यांनी करून दिला. आभार मुरलीधर जाधव यांनी मानले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!