उदयोत्सवात खाद्य-बौद्धिक-मनोरंजनाची तिहेरी मेजवानी

0
उदयोत्सवात खाद्य-बौद्धिक-मनोरंजनाची तिहेरी मेजवानी

उदगीर (एल पी उगिले) येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन ‘उदयोत्सव 25-26’ चा दुसरा दिवस विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे व विविधांगी उपक्रमांमुळे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. ज्ञान, संस्कृती आणि सृजनशीलतेचा सुरेख संगम या दिवशी अनुभवायला मिळाला.
दिवसाच्या सत्रात आयोजित विज्ञान प्रदर्शन, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा तसेच प्रश्नमंजूषा या उपक्रमांतून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, संशोधन वृत्ती आणि वैचारिक मांडणी कौशल्ये प्रकर्षाने समोर आली. विविध विषयांवरील अभिनव मांडणी व तर्कसुसंगत सादरीकरणाने परीक्षकांसह उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
‘आनंदनगरी’ अंतर्गत उभारण्यात आलेल्या बावीस खाद्य स्टॉल्सवर महाराष्ट्रासह देशातील विविध प्रांतांतील पारंपरिक व आधुनिक खाद्यपदार्थांची रेलचेल पाहायला मिळाली. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक, पालक व माजी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी विद्यार्थ्यांनी एक लक्ष रुपयाची स्वयं कमाई केली. सायंकाळच्या सत्रात आयोजित पसतीस नृत्य आणि गायन सादरीकरणांनी कार्यक्रमाला मनोरंजनाची रंगत आणली. एकूण बावन्न विद्यार्थ्यांच्या कलागुणांना मिळालेल्या व्यासपीठामुळे प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात कलाकारांचे भरभरून कौतुक केले. ज्ञानवृद्धी, संस्कार आणि मनोरंजन यांचा समतोल साधणारा हा दिवस विद्यार्थी, शिक्षक, पालक तसेच माजी विद्यार्थी यांच्यासाठी अविस्मरणीय ठरला. आनंद नगरी साठी परीक्षक म्हणून इनर व्हील क्लब उदगीर च्या अध्यक्षा पल्लवी मुक्कावार तसेच माजी अध्यक्षा मानसी चन्नावार या उपस्थित होत्या. विज्ञान प्रदर्शनासाठी डॉ. बी. डी. अचवले आणि डॉ. एस. व्ही. चाटे परीक्षक होते, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी परीक्षक म्हणून श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील संगीत विभाग प्रमुख प्रा. डॉ. के. आर. अनवले तसेच प्रा.जे. आर. कांदे हे उपस्थित होते. विविध गुणदर्शन कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तोंडारे, बसवराज पाटील मलकापूरकर, सचिव डॉ. रामप्रसाद लखोटिया, प्रशांत पेन्सलवार, कोषाध्यक्ष महादेव नौबदे, सदस्य शिवराज वल्लापुरे, गजानन भातलवंडे , राजकुमार पुजारी , सुधाकर केंद्रे , युवराज धोत्रे उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!